लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २३ :
प्रसारमाध्यमांसाठी कार्यपद्धती :
१) कोणतीही व्यक्ती, प्रसारमाध्यमे किंवा स्टुडिओ किंवा छायाचित्रण सुविधा केंद्रे यांपैकी कोणत्याही प्रकारातून कोणत्याही बालकाबाबत, ज्यामुळे बालकाच्या लौकिकाची मानहानी होईल किंवा त्याच्या एकांततेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही बातमी किंवा भाष्य ते संपूर्ण व अधिकृत माहिती असल्याखेरीज देणार नाही किंवा असे भाष्य करणार नाही.
२) कोणत्याही प्रसारमाध्यमातील कोणत्याही बातमीमध्ये, बालकाचे नाव, पत्ता, छायाछित्र, कुटुंबाचे तपशील, शाळा, शेजारी यांसहित ज्यामुळे बालकाची ओळख उघड होईल असे इतर कोणतेही तपशील उघड केले जाणार नाहीत.
परंतु असे की, अधिनियमाखालील प्रकरणाची न्यायचौकशी करण्यासाठी सक्षम असलेल्या विशेष न्यायालयाने अशी माहिती उघड करणे बालकाच्या हिताचे आहे असे मत असेल तर, त्या न्यायालयाला त्याबाबतची कारणे लेखी नमूद करून अशी माहिती उघड करण्यास परवानगी देता येईल.
३) प्रसारमाध्यमे किंवा स्टुडिओ किंवा छायाचित्रण सुविधा केंद्र यांचा प्रकाशक किंवा मालक हा त्याच्या कर्मचाऱ्याच्या कृती व अकृतीबद्दल संयुक्तपणे व पृथकपणे जबाबदार असेल
४) जी पोटकलम १) किंवा पोटकलम २) च्या तरतुदींचे उल्लंघन करील अशी कोणतीही व्यक्ती सहा महिन्यांपेक्षा कमी नसेल परंतु एका वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कालावधीच्या कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाच्या किंवा दोन्हीही शिक्षांस पात्र असेल.