Rti act 2005 कलम ७ : विनंतीचा अर्ज निकाला काढणे :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ७ :
विनंतीचा अर्ज निकाला काढणे :
१)कलम ५ पोटकलम (२) च्या परंतुकास किंवा कलम ६, पोटकलम (३) च्या परंतुकास अधीन राहून, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, कलम ६ अन्वये माहिती मिळण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर, शक्य तितक्या शीघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून तीस दिवसाच्या आत, एकतर विहित करण्यात येईल अशा फीचे प्रदान केल्यावर माहिती देईल किंवा कलम ८ व ९ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कारणांपैकी कोणत्याही कारणासाठी विनंतीचा अर्ज फेटाळील :
परंतु, जर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तिचे जीवित वा स्वातंत्र यासंबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यपासून अठ्ठेचाळीस तासांच्या आत ती देण्यात येईल.
२)जर केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याने, किंवा यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकाऱ्याने, पोटकलम (१) अन्वये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत माहिती मिळण्याच्या विनंतीवर निर्णय देण्यात कसूर केली तर, अशा केंद्रीय जन माहिती अधिकाऱ्याने, किंवा, यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकाऱ्याने विनंती नाकारल्याचे मानण्यात येईल.
३)माहिती देण्याचा खर्च दर्शविणारी कोणतीही जादा फी प्रदान केल्यावर माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असेल त्याबाबतीत, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा, यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकारी, विनंती करणाऱ्या व्यक्तिस,-
(a)क)पोटकलम (१) अन्वये विहित केलेल्या फीनुसार ही जादा रक्कम त्याने कशाच्या आधारे ठरवली त्या हिशेबासह, माहिती पुरविण्याचा त्याने निर्धारित केलेला खर्च दर्शविणारा जादा फीचा तपशील नमूद करणारी सूचना पाठवील, व त्याद्वारे तिला ती फी भरण्याची विनंती करील, आणि उक्त सूचना पाठविल्याच्या व फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा, त्या पोटकलमामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या तीस दिवसांच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ, वगळण्यात येईल;
(b)ख)आकारलेल्या फीच्या रकमेसंबंधीच्या किंवा दिलेल्या माहितीच्या स्वरुपासंबंधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याच्या बाबतीत त्याचे किंवा तिचे अधिकार, तसेच अपील प्राधिकारी, कालमर्यादा प्रक्रिया व इतर कोणतेही स्वरुप याचा तपशील, या संबंधीची माहिती देणारी सूचना पाठवील.
४)या अधिनियामन्वये जेव्हा अभिलेखाची किंवा त्याच्या भागाची माहिती मिळवून द्यावयाची असेल अणि जिला ती माहिती मिळवून द्यावयाची आहे, अशी व्यक्ति ज्ञानेद्रियांच्या दृष्टीने विकलांग असेल त्याबाबतीत, यथास्थिति, केंद्रिय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, माहिती मिळविणे ज्यायोगे शक्य होईल असे सहाय्य देईल, तसेच पाहणी करण्यासाठी उचित असेल असेही सहाय्य देईल.
५)मागितलेली माहिती जेव्हा छापील स्वरुपात किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरुपात द्यावयाची असेल त्याबाबतीत, पोटकलम (६) च्या तरतुदींना अधीन राहून, अर्जदार, विहित करण्यात येईल अशी फी प्रदान करील :
परंतु,कलम ६ च्या पोटकलम (१) अन्वये आणि कलम ७ ची पोटकलमे (१) व (५) यांअन्वये विहित केलेली फी वाजवी असेल अणि अशी कोणतीही फी, ज्या व्यक्ति दारिद्रयरेषेखाली आहेत असे समुचित शासनाकडून निर्धारित करण्यात येईल अशा व्यकिं्तकडून आकारण्यात येणार नाही.
६)पोटकलम (५) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर सार्वजनिक प्राधिकरणाने पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेचे पालन करण्यात कसूर केली असेल तर, माहिती मिळविण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिस, ती माहिती मोफत देण्यात येईल.
७)पोटकलम (१) अन्वये कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, त्रयस्थ पक्षाने कमल ११ अन्वये केलेले निवेदन विचारात घेईल.
८)जेव्हा पोटकलम (१) अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात आला असेल त्याबाबतीत, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा राज्य जन माहिती अधिकारी, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तिस, –
(एक)असा विनंतीचा अर्ज फेटाळण्याची कारणे ;
(दोन)ज्या कालावधीत असा विनंतीचा अर्ज फेटाळल्याच्या विरोधात अपील करता येईल तो कालावधी; आणि
(तीन)अपील प्राधिकरणाचा तपशील;
कळवील.
९)सार्वजनिक प्राधिकरणाची साधनसामग्री या कामासाठी प्रमाणाबाहेर वळवावी लागत नसल्यास, किंवा प्रस्तुत अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या किंवा जतन करण्याच्या दृष्टीने ते हानीकारक नसल्यास, माहिती ज्या स्वरुपात मागण्यात आली असेल त्याच स्वरुपात ती सर्वसाधारणपणे, पुरविण्यात येईल.

Leave a Reply