Rti act 2005 कलम २ : व्याख्या :

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार अन्य अर्थ अपेक्षित नसेल तर,-
(a)क)समुचित शासन या अर्थ –
एक)केंद्र सरकार किंवा संघराज्य क्षेत्र प्रशासन यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या, घटित करण्यात आलेल्या, त्यांच्याकडे मालकी असलेल्या अथवा त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीद्वारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो, अशा सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबतीत, केंद्र सरकार असा आहे;
दोन)राज्य शासनांकडून स्थापन करण्यात आलेल्या, घटित करण्यात आलेल्या त्यांच्याकडे मालकी असलेल्या, त्यांच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या अथवा त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निधीद्वारे ज्यांना मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करण्यात येतो अशा सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबतीत, राज्य शासन, असा आहे;
(b)ख)केंद्रीय माहिती आयोग, याचा अर्थ कलम १२, पोटकलम (१) खाली घटित करण्यात आलेला केंद्रीय माहिती आयोग, असा आहे;
(c)ग)केंद्रीय जन माहिती अधिकारी याचा अर्थ कलम ५, पोटकलम (१) अन्वये पदनिर्देशित करण्यात आलेला केंद्रीय जन माहिती अधिकारी, असा आहे आणि यात कलम ५, पोटकलम (२) अन्वये अशा प्रकारे पदनिर्देशि करण्यात आलेल्या कें्रद्रीय सहायक जन माहिती अधिकारचाही समावेश होता;
(d)घ)मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त याचा अर्थ, कलम १२, पोटकलम (३) अन्वये नियुक्त करण्यात आलेला मुख्य माहिती आयुक्त, असा आहे;
(e)ड)सक्षम प्राधिकारी याचा अर्थ,-
एक)लोकसभेच्या किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा अशा प्रकारच्या सभा असणाऱ्या संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत, अध्यक्ष आणि राज्यसभा किंवा राज्य विधानपरिषद यांच्या बाबतीत, सभापती;
दोन)सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचा मुख्य न्यायमुर्ती;
तीन)उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमुर्ती;
चार)संविधानाद्वारे किंवा त्याअन्वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत, यथास्थिति, राष्ट्रपती किंवा राज्यपाल;
पाच)संविधानाच्या अनुच्छेद २३९ अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक;
असा आहे;
(f)च)माहिती याचा अर्थ, कोणत्याही स्वरुपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामध्ये, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ई-मेल, अभिप्राय, सूचना, प्रसिद्धिपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, संविदा, अहवाल, कागदपत्रे, नमुने, प्रतिमाने (मॉडेल), कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील आधार सामग्री आणि त्या त्या वेळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणास मिळविता येईल अशी कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहिती, यांचा समावेश होतो;
(g)छ)विहित याचा अर्थ, यथास्थिति, समुचित शासन किंवा सक्षम प्राधिकारी यांनी या अधिनियमान्वये तयार केलेल्या नियमांद्वारे विहित केलेले नियमांद्वारे विहित केलेले असा आहे;
(h)ज)सार्वजनिक प्राधिकरण याचा अर्थ,-
क)संविधानाद्वारे किंवा तद्न्वये (त्याअन्वये);
ख)संसदेने तयार केलेल्या कोणत्याही अन्य कायद्याद्वारे;
ग)राज्य विधानमंडळाने तयार केलेल्या कोणत्याही अन्य कायद्याद्वारे;
घ)समुचित शासनाने काढलेल्या अधिसूचनेद्वारे किंवा आदेशाद्वारे स्थापन करण्यात आलेले किंवा घटित करण्यात आलेले कोणतेही प्राधिकरण किंवा निकाय किंवा स्वराज्य संस्था, असा आहे आणि त्यामध्ये,
एक)समुचित शासनाची मालकी असलेला, त्याचे नियंत्रण असलेला किंवा त्याच्याकडून निधीद्वारे ज्याला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो असा निकाय (कंपनी);
दोन)समुचित शासनाकडून निधीद्वारे जिला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो, अशी अशासकीय संघटना, यांचा समावेश होतो;
(i)झ)अभिलेख यामध्ये,-
क)कोणताही दस्तऐवज, हस्तलिखित व फाईल;
ख)एखाद्या दस्तऐवजाची कोणतीही मायक्रोफिल्म, मायक्रोफिश आणि प्रतिरुप प्रत;
ग)अशा मायक्रोफिल्ममध्ये संग्रहित केलेल्या प्रतिमेची किंवा प्रतिमांची कोणतीही नक्कल (मग ती परिवर्तित केलेली असो वा नसो); आणि
घ)संगणकाद्वारे किंवा कोणत्याही अन्य उपकणाद्वारे तयार केलेले कोणतेही अन्य साहित्य यांचा समावेश होता;
(j)ञ)माहितीचा अधिकार याचा अर्थ, कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळविता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे. आणि त्यामध्ये,-
एक)एखादे काम, दस्तऐवज, अभिलेख यांची पाहणी करणे;
दोन)दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या टिप्पण्या, उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे;
तीन)सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे;
चार)डिस्केट्, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट या स्वरुपातील किंवा कोणत्याही अन्य इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती किंवा जेव्हा अशी माहिती संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठविलेली असेल त्याबाबतीत मुद्रित प्रती (प्रिन्टआऊट) मार्फत माहिती मिळविणे; यांबाबतचा अधिकार समावेश होता;
(k)ट)राज्य माहिती आयोग याचा अर्थ, कलम १५ च्या पोटकलम (१) अन्वये घटित केलेला राज्य माहिती आयोग असा आहे;
(l)ठ)राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त याचा अर्थ, कलम १५ च्या पोटकलम (३) अन्वये नियुक्त केलेला राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त असा आहे;
(m)ड)राज्य जन माहिती अधिकारी याचा अर्थ, कलम ५ पोटकलम(१) अन्वये पदनिर्देशित केलेला राज्य जन माहिती अधिकारी, असा आहे आणि त्यामध्ये , कलम ५ च्या पोटकलम (२) अन्वये अशा प्रकारे पदनिर्देशित केलेल्या राज्य सहायक जन माहिती अधिकाऱ्याचा समावेश होता;
(n)ढ)त्रयस्थ पक्ष याचा अर्थ, माहिती मिळण्याची विनंती करणाऱ्या नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ति, असा आहे आणि त्यामध्ये, सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होता.

Leave a Reply