माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम २६ :
समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे :
१)समुचित शासनाला, वित्तीय व इतर साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार,-
(a)क)या अधिनियमान्वये अभिप्रेत असलेल्या अधिकारांचा वापर कसा करावयाचा यासाठी समाजाचे, विशेषत: समाजातील उपेक्षित वर्गाचे प्रबोधन करण्याकरिता शैक्षणिक कार्यक्रम तयार करता येतील व त्यांचे आयोजन करता येईल;
(b)ख)खंड (क) मध्ये निर्देश केलेले कार्यक्रम तयार करणे व त्यांचे आयोजन करणे, यांमध्ये सार्वजनिक प्राधिकरणांना सहभागी होण्यास आणि त्यांनी असे कार्यक्रम स्वत: हाती घेण्यास प्रोत्साहन देता येईल;
(c)ग)सार्वजनिक प्राधिकरणांद्वारा त्याच्या उपक्रमांविषयीची अचूक माहिती योग्यवेळी व प्रभावीपणे प्रसारित केली जाण्यास चालना देता येईल; आणि
(d)घ)सार्वजनिक प्राधिकरणाचे, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांना, प्रशिक्षण देता येईल व सार्वजनिक प्राधिकरणांना त्यांच्या उपयोगाकरिता संबंधित प्रशिक्षण सामग्री पुरविता येईल.
२)समुचित शासन, या अधिनियमाच्या प्रारंभापासून अठरा महिन्यांच्या आत, या अधिनियमात विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकारांचा वापर करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तिला वाजवीरित्या आवश्यक असेल अशी माहिती असणारी मार्गदर्शिका, अगदी सहज आकलन होईल अशा स्वरुपात व अशा पद्धतीने आपल्या राजभाषेत संकलित करील.
३)समुचित शासन, आवश्यक असल्यास, पोटकलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेली मार्गदर्शक तत्वे नियमित कालांतराने अद्ययावत करुन प्रसिद्ध करील आणि विशेषत: व पोटकलम (२) च्या सर्वसाधारणतेला बाध न येऊ देता या मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल :-
(a)क)या अधिनियमाची उद्दिष्टे ;
(b)ख)प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाचा कलम ५ च्या पोटकलम (१) अन्वये, नेमणूक केलेला, यथास्थिति, केंद्रीय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी व फॅक्स क्रमांक आणि उपलब्ध असल्यास, ई-मेल अॅड्रेस;
(c)ग)केंद्रीय जन माहिती अधिकारी, किंवा यथास्थिति, राज्य जन माहिती अधिकारी यांच्याकडे माहिती मिळविण्याकरिता विनंती करण्याची रीत व तिचे स्वरुप;
(d)घ)या अधिनियमान्वये, सार्वजनिक प्राधिकरणांचे, यथास्थिति, केंद्रिय जन माहिती अधिकारी किंवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्याकडून उपलब्ध होणारे सहाय्य व त्यांची कर्तव्ये;
(e)ड) केंद्रीय माहिती आयोग किंवा यथास्थिति, राज्य माहिती आयोग यांच्याकडून उपलब्ध होणारे सहाय्य;
(f)च)या अधिनियमाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या किंवा लादलेल्या कर्तव्यांच्या बाबतीतील कृती किंवा कृती करण्यात केलेली कसूर यासंबंधात कायद्यातील उपाययोजना, तसेच आयोगाकडे अपील दाखल करण्याची पद्धती ;
(g)छ)कलम ४ अनुसार विविध प्रकारचे अभिलेख स्वेच्छेने प्रकट करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी;
(h)ज)माहिती मिळविण्यासाठी केलेल्या विनंतीच्या संबंधात द्यावयाच्या फीबाबतची नोटीस; अणि
(i)झ)या अधिनियमानुसारा माहिती मिळविण्यासंबंधात करण्यात आलेले कोणतेही अतिरिक्त विनियम अथवा काढण्यात आलेली परिपत्रके.
४)समुचित शासनाने, आवश्यकता वाटल्यास मार्गदर्शक तत्वे नियमित कालांतराने अद्ययावत करुन ती प्रसिद्ध केलीच पाहिजेत.