महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –
(a) क) (अ) बाधित व्यक्ती म्हणजे, जी महिला उत्तरवादीशी कौटुंबिक नातेसंबंधित आहे किंवा तशी राहिलेली आहे आणि उत्तरवादीच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृतीची शिकार ठरल्याचा जी आरोप करते अशी कोणतीही महिला;
(b) ख) (ब) बालक म्हणजे अठरा वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती आणि त्यात कोणतेही दत्तक, सावत्र किंवा वाढवलेले मूल यांचा अंतर्भाव होतो;
(c) ग) (क) भरपाई आदेश म्हणजे कलम २२ च्या अनुसार दिलेला आदेश;
(d) घ) (ड) ताबा आदेश म्हणजे कलम २१ च्या अनुसार दिलेला आदेश;
(e) ङ) (इ) कौटुंबिक घटनेचे प्रतिवृत्त म्हणजे बाधित व्यक्तीकडून कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मिळाल्यानंतर विहित नमुन्यात तयार केलेले प्रतिवृत्त;
(f) च) (फ) कौटुंबिक नातेसंबंध म्हणजे, ज्या रक्तसंबंधाने, विवाहसंबंधाने किंवा विवाहाच्या किंवा दत्तकाच्या स्वरूपाच्या संबंधाने संबंधित असताना बरोबरीने घरात एकत्र राहत आहेत किंवा विशिष्ट वेळी एकत्र राहत होत्या अशा किंवा एकत्र कुटुंब म्हणून एकत्र राहत असलेले कुटुंब सदस्य असलेल्या दोन व्यक्तींमधील नातेसंबंध;
(g) छ) (ग) कौटुंबिक हिंसाचार याला कलम ३ मध्ये जो अर्थ दिला आहे तोच अर्थ असेल;
(h) ज) (ह) हुंडा याला हुंडा प्रतिबंध अधिनियम, १९६१ (१९६१ चा अधिनियम २८) याच्या कलम २ मध्ये त्याला जो अर्थ दिला असेल तोच अर्थ असेल;
(i) झ) (आय) दंडाधिकारी म्हणजे, बाधित व्यक्ती तात्पुरती किंवा अन्य प्रकारे जेथे राहत असेल किंवा उत्तरवादी जेथे राहत असेल किंवा कौटुंबिक हिंसाचार जेथे घडल्याचा आरोप असेल त्या क्षेत्रातील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी किंवा, यथास्थिती, त्या क्षेत्रात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याखालील अधिकारितेचा वापर करणारा महानगर दंडाधिकारी;
(j) ञ) (जे) वैद्यकीय सुविधा म्हणजे, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी वैद्यकीय सुविधा असतील असे राज्य शासन अधिसूचित करील अशा सुविधा;
(k) ट) (के) आर्थिक साहाय्य म्हणजे, या अधिनियमाखाली कोणतीही भरपाई मागण्यासाठी केलेल्या अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान कोणत्याही टप्प्यात, केलेल्या खर्चाची आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या परिणामी बाधित व्यक्तीला सोसाव्या लागलेल्या हानीच्या भरपाईसाठी उत्तरवादीने बाधित व्यक्तीला द्यावी म्हणून दंडाधिकारी आदेश देईल अशी भरपाई;
(l) ठ) (ल) अधिसूचना म्हणजे शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केलेली अधिसूचना आणि अधिसूचित या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावण्यात येईल;
(m) ड) (म) विहित म्हणजे, या अधिनियमाखाली केलेल्या नियमाद्वारे विहित केलेले;
(n) ढ) (न) संरक्षण अधिकारी म्हणजे, कलम ८ च्या पोटकलम (१) अन्वये राज्य शासनाने नियुक्त केला असेल असा अधिकारी;
(o) ण) (ओ) संरक्षण आदेश म्हणजे, कलम १८ च्या अनुसार काढलेला आदेश;
(p) त) (पी) निवास आदेश म्हणजे, कलम १९ च्या पोटकलम (१) च्या अनुसार देण्यात आलेला आदेश;
(q) थ) (क्यू) उत्तरवादी म्हणजे, जिचा बाधित व्यक्तीशी कौटुंबिक नातेसंबंध आहे किंवा होता आणि जिच्याकडून बाधित व्यक्तीने या अधिनियमान्वये कोणताही अनुतोष मागितला आहे अशी कोणतीही सज्ञान पुरूष व्यक्ती :
परंतु असे की, बाधित पत्नी किंवा वैवाहिक स्वरूपाच्या नातेसंबंधात राहणारी महिला पतीच्या किंवा पुरूष सहयोगीच्या नातेवाइकाविरूद्ध सुद्धा तक्रार दाखल करू शकेल;
(r) द) (आर) सेवा पुरविणारा म्हणजे कलम १० च्या पोटकलम (१) अन्वये नोंदणी केलेले अस्तित्व (एनटीटी);
(s) ध) (एस) विभागून राहत असलेले घरदार म्हणजे, बाधित व्यक्ती कौटुंबिक नातेसंबंधाने जेथे एकतर एकटी किंवा उत्तरवादीबरोबर राहते किंवा कोणत्याही टप्प्यात राहिलेली असेल असे घरदार आणि त्यात बाधित व्यक्ती आणि उत्तरवादी यांच्या संयुक्तपणे मालकीच्या किंवा भाड्याच्या घरादाराचा किंवा ज्यामध्ये बाधित व्यक्ती आणि उत्तरवादी यांना एकेकट्याने किंवा दोघांना संयुक्तपणे अधिकार, हक्क, हितसंबंध किंवा समन्याय आहे असे त्यांच्यापैकी कोणच्याही मालकीच्या किंवा भाड्याच्या घरादाराचा समावेश होतो आणि त्यात उत्तरवादी ज्या एकत्र कुटुंबातील कुटुंबीय आहे अशा, कुटुंबाच्या मालकीच्या घरादाराचा अशा विभागून राहत्या घरादारात उत्तरवादीचा किंवा बाधित व्यक्तीचा कोणताही अधिकार, हक्क किंवा हितसंबंध आहे किंवा नाही हे विचारात न घेता, समावेश होतो.
(t) न) (टी) आश्रयगृह म्हणजे, या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी आश्रयगृह होण्यासाठी राज्य शासन अधिसूचनेद्वारे घोषित केले असेल असे आश्रयगृह.