महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
कलम २३ :
अंतरिम आणि एकतर्फी आदेश काढण्याचा अधिकार :
(१) या अधिनियमाखालील कोणतीही कार्यवाही त्याच्यासमोर प्रलंबित असताना, दंडाधिकाऱ्याला, त्याला न्याय्य आणि योग्य वाटतील असे अंतरिम आदेश काढता येतील.
(२) एखाद्या अर्जावरून सकृतदर्शनी असे उघड होत असेल की, उत्तरवादी कौटुंबिक हिंसाचाराची कृती करीत आहे किंवा त्याने तशी कृती केली आहे किंवा उत्तरवादी कौटुंबिक हिंसाचाराची कृती करील अशी शक्यता आहे याबाबत दंडाधिकाऱ्याचे समाधान झाले असेल तर, त्याला बाधित व्यक्तीच्या शपथपत्राच्या आधारावर, उत्तरवादीविरूद्ध कलम १८, कलम १९, कलम २०, कलम २१ किंवा यथास्थिती कलम २२ अन्वये विहित करण्यात येईल अशा नमुन्यात एकतर्फी आदेश काढता येईल.