Pwdva act 2005 कलम १२ : दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे :

महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
प्रकरण ४ :
साहाय्याचे आदेश मिळविण्यासाठीची कार्यपद्धती :
कलम १२ :
दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे :
(१) या अधिनियमाखालील एक किंवा अधिक साहाय्ये मागण्यासाठी, बाधित व्यक्तीला किंवा संरक्षण अधिकाऱ्याला किंवा बाधित व्यक्तीच्या वतीने इतर कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल :
परंतु असे की, अशा अर्जावर कोणताही आदेश काढण्यापूर्वी, दंडाधिकारी, संरक्षण अधिकाऱ्याकडून किंवा सेवा पुरविणाऱ्याकडून त्याच्याकडे कोणतेही कौटुंबिक घटना प्रतिवृत्त आले असेल तर तेही विचारात घेईल.
(२) पोटकलम (१) अन्वये मागण्यात आलेल्या अनुतोषामध्ये, उत्तरवादीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कृतीमुळे झालेल्या नुकसानभरपाई किंवा भरपाई मागण्यासाठी दावा दाखल करण्याच्या बाधित व्यक्तीच्या हक्काला बाधा न पोहोचवता अशा व्यक्तीसाठी नुकसानभरपाई किंवा भरपाई आदेश काढण्यासाठीच्या साहाय्याला समावेश असू शकतो :
परंतु असे की, कोणत्याही न्यायालयाने बाधित व्यक्तीच्या नावाने नुकसान भरपाईचा किंवा भरपाईचा हुकूमनामा काढला असेल तर, दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५)(आता १९७४ चा २) यामध्ये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी दंडाधिकाऱ्याने या अधिनियमान्वये काढलेल्या आदेशानुसार त्या व्यक्तीला दिलेली किंवा देय असलेली रक्कम, अशा हुकूमान्वये देय असलेल्या रकमेमधून वजा करण्यात येईल आणि असा हुकूमनामा, अशा वजावटीनंतर कोणतीही रक्कम शिल्लक असल्यास त्या रकमेपुरतीच अंमलबजावणीयोग्य असेल.
(३) पोटकलम (१) खालील प्रत्येक अर्ज विहित करण्यात येईल अशा नमुन्यात असेल आणि त्यामध्ये विहित करण्यात येतील असे किंवा त्याच्याशी शक्य तितक्या जवळचे असणारे तपशीलच असतील.
(४) दंडाधिकारी सुनावणीची पहिली तारीख निश्चित करील, अशी तारीख सर्वसामान्यपणे न्यायालयाकडे अर्ज मिळाल्यापासून तीन दिवसांनंतरची असेल.
(५) दंडाधिकारी, पोटकलम (१) खाली करण्यात आलेला प्रत्येक अर्ज पहिल्या सुनावणीच्या तारखेपासून साठ दिवसांच्या कालावधीत निकालात काढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करील.

Leave a Reply