Pocso act 2012 कलम २ : व्याख्या :

लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम २ :
व्याख्या :
१) या अधिनियमात, संदर्भानुसार, दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर-
अ) गंभीर स्वरूपाचा लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला याला कलम ५ मध्ये जो अर्थ नेमून दिलेला असेल तोच अर्थ असेल,
ब)गंभीर स्वरूपाच लैंगिक हमला याला कलम ९ मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल,
क) सशस्त्र दल किंवा सुरक्षा दल याचा अर्थ, अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे, संघराज्याचे सशस्त्र दल किंवा सुरक्षा दल किंवा पोलीस दल असा आहे
ड)बालक याचा अर्थ, अठरा वर्षें वयाखालील कोणतीही व्यक्ती, असा आहे
१.(डअ) बालकासंबंधी अश्लील साहित्य याचा अर्थ, एखाद्या बालकाचे (मुलाचे) लैंगिक संबंध प्रस्थापित करतानाचे कोणतेही दृश्य चित्रण अभिप्रेत आहे, याच्या अंतर्गत छायाचित्र, व्हिडियो, डिजिटल किंवा कॉम्प्युटर निर्मित प्रतिमा (आकृती) जी वास्तविक बालक असल्यासारखी वाटेल आणि सृजित, रुपांतरित किंवा परिवर्तित परंतु बालकाचे चित्र प्रतीत होते अशी आकृती यांचा समावेश आहे.)
ई)कौटुंबिक नातेसंबंध याला महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, २००५ (२००५ चा ४३) याच्या कलम २ च्या खंड(फ) मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल,
फ) लिंगप्रवेश अंतर्भूत असलेला लैंगिक हमला याला कलम ३ मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल
ग)विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या
नियमांद्वारे विहित, असा आहे
ह)धार्मिक संस्था याला धार्मिक संस्था (दुरूपयोगास प्रतिबंध) अधिनियम, १९८८(१९८८)चा ४१) यामध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल,
आय) लैंगिक हमला याला कलम ७ मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल
जे) लैंगिक सतावणूक याला कलम ११ मध्ये जो अर्थ नेमून दिला असेल तोच अर्थ असेल
के) सामाईक घरदार याचा अर्थ, जेथे अपराधाचा आरोप असलेली व्यक्ती बालकासोबत कौटुंबिक नातेसंबंधाने कोणत्याही वेळी राहत असेल किंवा राहिलेली असेल असे घरदार असा आहे
एल) विशेष न्यायालय याचा अर्थ, कलम २८ अन्वये नियुक्त केलेले न्यायालय, असा आहे
एम) विशेष सरकारी अभियोक्ता याचा अर्थ, कलम ३२ अन्वये नेमणूक केलेला सरकारी अभियोक्ता, असा आहे.
२) या अधिनियमात ज्या शब्दांचा व अभिव्यक्त (पद, शब्दसमुह) यांचा उल्लेख केला नसेल परंतु भारतीय दंड संहिता १८६०, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, २.(बाल (किशोर) न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ (२०१६ चा २) मध्ये जे अर्थ असतील तेच अर्थ उक्त संहिता व अधिनियमांमध्ये असेल.
———–
१. सन २०१९ चा २५ च्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले (१८-०८-२०१९ रोजी व तेव्हा पासून).
२. सन २०१९ चा २५ कलम २ अन्वये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० याशब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले (१८-०८-२०१९ रोजी व तेव्हा पासून).

Leave a Reply