Pcr act कलम ४: सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :

नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
कलम ४:
सामाजिक नि:समर्थता लादण्याबद्दल शिक्षा :
जो कोणी-
(एक) कोणत्याही दुकानात, सार्वजनिक उपाहारगृहात, हॉटेलात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानी प्रवेश करणे, किंवा
(दोन) सर्वसाधारण जनतेच्या किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाच्या) उपयोगाकरित एखादे सार्वजनिक उपाहारगृह, हॉटेल, धर्मशाळा, सराई किंवा मुसाफिरखाना येथे ठेवलेल्या कोणत्याही भांड्यांचा व अन्य वस्तूचा वापर करणे; किंवा
(तीन) कोणताही पेशा आचरणे किंवा कोणताही व्यवसाय, उदीम किंवा धंदा चालवणे २.(किंवा कोणत्याही कामावर नोकरीस राहणे;) किंवा
(चार) जनतेतील इतर व्यक्तींना किंवा त्यांपैकी एखाद्या वर्गाला ज्याचा वापर करण्याचा अधिकार असेल किंवा जेथे प्रवेश करता येत असेल अशी कोणतीही नदी, ओहळ, झरा, विहीर, तलाव, हौद, पाण्याचा नळ किंवा अन्य जलस्थान अथवा कोणताही स्नानघाट अथवा दफनभूमी, कोणतीही स्वच्छताविषयक सोय, कोणताही रस्ता किंवा तेथे प्रवेश करणे; किंवा
(पाच) पूर्णत: किंवा अंशत: राज्य निधीतून ज्याचा खर्च चालवण्यात येतो असे कोणतेही धर्मादायी किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी वापरले जाणारे अथवा सर्वसाधारण जनतेच्या किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाच्या) वापरासाठी समर्पित केलेले कोणतेही स्थान यांचा वापर करणे किंवा तेथे प्रवेश करणे; किंवा
(सहा) सर्वसाधारण जनतेच्या किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाच्या) फायद्यासाठी निर्माण केलेल्या कोणत्याही धर्मादायी न्यासाखालील कोणताही फायदा उपभोगणे; किंवा
(सात) कोणत्ंयाही सार्वजनिक वाहनाचा वापर करणे किंवा त्यात प्रवेश करणे; किंवा
(आठ) कोणत्याही प्रकारच्या स्थानिक भागात एखाद्या राहण्याच्या वास्तूचे बांधकाम करणे, संपादन करणे किंवा तेथे वहिवाट करणे; किंवा
(नऊ) सर्वसाधारण जनतेला किंवा १.(त्यापैकी एखाद्या वर्गाला) खुल्या असलेल्या अशा कोणत्याही धर्मशाळेचा, सराईचा किंवा मुसाफिरखान्याचा वापर करणे; किंवा
(दहा) कोणतीही सामाजिक किंवा धार्मिक रुढी, परिपाठ, किंवा उपचार पाळणे अथवा ३.(कोणत्याही धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक मिरवणुकीमध्ये भाग घेणे किंवा तशी मिरवणूक काढणे;) किंवा
(अकरा) जडजवाहीर व आभूषणे वापरणे,
या बाबतीत एखाद्या व्यक्तीवर अस्पृश्यते च्या कारणावरुन कोणतीही नि:समर्थता लादील तो,४.(एक महिन्याहून कमी नाही आणि सहा महिन्याहून जास्त नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व शंभर रुपयांहून कमी नाही इतक्या मुदतीच्या कारावासास व शंभर रुपयांहून कमी नाही व पाचशे रुपयांहून जास्त नाही अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.)
२.(स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, कोणत्याही प्रकारची नि:समर्थता लादणे यामध्ये, अस्पृश्यते वर आधारलेला कोणताही भेदभाव समाविष्ट आहे. )
———-
१. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ६ अन्वये मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
२. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ६ अन्वये (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
३. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ६ अन्वये कोणत्याही धार्मिक मिरवणुकीत भाग घेणे या मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.
४. १९७६ चा अधिनियम क्रमांक १०६ याच्या कलम ६ अन्वये मूळ मजकुराऐवजी (१९-११-१९७६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply