गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
प्रकरण ३ :
प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचे विनियमन :
कलम ४ :
प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचे विनियमन :
या अधिनियमाच्या प्रारंभास व तेव्हापासून,-
१) खंड (२) मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली प्रयोजने खेरीजकरुन आणि खंड (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही शर्तीची पूर्तता केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला, नोंदणी केलेले आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय यांसह कोणत्याही ठिकाणाचा उपयोग, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्यासाठी किवा असा वापर करण्याची व्यवस्था करण्यासाठी करता येणार नाही;
२) पुढीलपैकी कोणत्याही अपसामान्यतेची तपासणी करण्याच्या प्रयोजनाशिवाय प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करता येणार नाही :-
एक) गुणसूत्रीय अपसामान्यता;
दोन) आनुवंशिक – चयापचय -रोग ;
तीन) हिमोग्लोबिन विकृती ;
चार) लिंग-संलग्न आनुवंशिक रोग;
पाच) जन्मजात विसंगती;
सहा) केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा इतर अपसामान्यता किंवा रोग ;
१(३) प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यास अर्ह असलेल्या व्यक्तीची, पुढीलपैकी कोणतीही शर्त पूर्ण करण्यात आली असल्याबाबत, लेखी नमूद करावयाच्या कारणास्तव, खात्री पटली असल्याखेरीज, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राचा वापर करण्यात येणार नाही किंवा ते संचालित करण्यात येणार नाही :-
एक) गर्भवती महिलेचे वय ३५ वर्षापेक्षा अधिक आहे;
दोन) गर्भवती महिलेचा दोन किंवा अधिक वेळा आकस्मिक गर्भपात किंवा गर्भहानी झालेली आहे;
तीन) गर्भवती महिलेवर औषधिद्रव्ये, किरणोत्सर्ग, जंतुसंसर्ग किंवा रासायनिक द्रव्ये यांसारख्या गर्भविकृतिकारक पदार्थांचा मारा झालेला आहे ;
चार) गर्भवती महिला किंवा तिचा पती यांना मतिमंदत्व किंवा स्नायुतानतेसारखी शारीरिक विरुपता किंवा कोणताही इतर आनुवंशिक रोग, यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी आहे;
पाच) मंडळाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशी इतर कोणतीही शर्त :
परंतु असे की, गर्भवती महिलेची स्वनातीत चित्रण करणारी व्यक्ती, विहित करण्यात येईल अशा रीतीने चिकित्सालयात त्याचा संपूर्ण अभिलेख ठेवील आणि त्यात आढळलेली कोणतीही कमतरता किंवा दोषपूर्णता राहिल्यास असे स्वनातीत चित्रण करणाऱ्या व्यक्तीला एतद्विरुद्ध सिद्ध करता आले नाही तर, कलम ५ किवा कलम ६ च्या तरतुदींचे उल्लंघन मानले जाईल.
४) गर्भवती महिलेची नातेवाईक किंवा पती यांसह कोणतीही व्यक्ती, खंड (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रयोजनाशिवाय, तिच्यावर कोणत्याही प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांचा वापर करण्याची मागणी करणार नाही किंवा त्यास उत्तेजन देणार नाही;
५) महिलेचा नातेवाईक किंवा पती यांसह कोणतीही व्यक्ती, तिच्यावर किंवा त्याच्यावर किंवा दोघांवरही कोणत्याही लिंग निवड तंत्राचा वापर करण्याची मागणी करणार नाही किंवा त्यास उत्तेजन देणार नाही.)
———
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम ७ द्वारे उपखंड (३) व (४) समाविष्ट करण्यात आले. (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून)
