Pcpndt act कलम ३० : १.(अभिलेख, इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम ३० :
१.(अभिलेख, इत्यादींची झडती घेणे व जप्त करणे याचा अधिकार :
१) जर, कोणत्याही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रामध्ये, आनुवंशिकीय प्रयोगशाळेत, आनुवंशिकीय चिकित्सालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, या अधिनियमाखालील एखादा अपराध करण्यात आला आहे किंवा करण्यात येत आहे असे समुचित प्राधिकरणाला सकारण वाटत असेल तर, असे प्राधिकरण किंवा याबाबतीत प्राधिकृत केलेला कोणताही अधिकारी यास, विहित करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून, अशा आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रात, आनुवंशिकीय प्रयोगशाळेत, आनुवंशिकीय चिकित्सालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी, अशा प्राधिकरणाला किंवा अधिकाऱ्याला ज्या मदतीची, कोणतीही असल्यास, आवश्यकता वाटत असल्यास अशा मदतीसह सर्व वाजवी वेळांमध्ये प्रवेश करता येईल व झडती घेता येईल आणि तेथील कोणताही अभिलेख, नोंदवही, दस्तऐवज, वही, पत्रक, जाहिरात किंवा तेथे आढळणारी इतर कोणतीही वस्तू यांची तपासणी करता येईल आणि या अधिनियमाअन्वये, शिक्षापात्र असलेला अपराध केल्याचा पुरावा म्हणून या बाबी सादर करता येतील असे या प्राधिकरणास किंवा अधिकाऱ्यास सकारण वाटत असेल तर, त्या जप्त करुन त्यास मोहोरबंद करता येईल.)
२) झडती व जप्ती या संबंधातील फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या तरतुदी, शक्य असतील तेथवर, या अधिनियमाअन्वये केलेल्या प्रत्येक झडतीस किंवा जप्तीस लागू होतील.
———–
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम २२ द्वारे पोट-कलम (१) ऐवजी दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply