गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
प्रकरण ८ :
संकीर्ण :
कलम २९ :
अभिलेख ठेवणे :
१) या अधिनियमाअन्वये व नियमांन्वये ठेवणे आवश्यक असलेले सर्व अभिलेख, तक्ते, नमुने, अहवाल, संमतीपत्रे व इतर सर्व दस्तऐवज दोन वर्षांच्या कालावधीकरिता किंवा विहित करण्यात येईल एवढ्या कालावधीकरिता जतन करुन ठेवण्यात येईल :
परंतु असे की, एखाद्या आनुवंशिकीय समुपदेशन केंद्राच्या, आनुवंशिकीय प्रयोगशाळेच्या किंवा अनुवंशिकीय चिकित्सालयाच्या विरुद्ध कोणताही फौजदारी व अन्य खटला दाखल करण्यात आलेला असेल तर, त्या केंद्राचे, प्रयोगशाळेचे किंवा चिकित्सालयाचे अभिलेख व इतर सर्व दस्तऐवज, असा खटला अंतिमरीत्या निकालात निघेपर्यंत जतन करुन ठेवण्यात येतील.
२) असे सर्व अभिलेख, समुचित प्राधिकरणाला किंवा समुचित प्राधिकरणाने याबाबतीत प्राधिकृत केलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीला तपासणीसाठी सर्व वाजवी वेळी उपलब्ध करुन देण्यात येतील.