गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
कलम २६ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
१) या अधिनियमान्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध एखाद्या कंपनीने केला असेल त्याबाबतीत अपराध घडला त्यावेळी जी व्यक्ती, कंपनीचे कामकाज चालू ठेवण्यासाठी कंपनीची प्रभारी होती किंवा कंपनीला जबाबदार होती अशी प्रत्येक व्यक्ती तसेच, कंपनी ही, अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि ती तिच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा होण्यास पात्र असेल :
परंतु असे की, जर, तो अपराध त्या व्यक्तीच्या नकळत घडला होता किंवा तिने असा अपराध घडू नये म्हणून योग्य ती सर्व तत्परता दाखविली होती हे सिद्ध केले तर, या पोटकलमात अंतर्भूत असलेली कोणतीही बाब, अशा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही शिक्षेस पात्र ठरवू शकणार नाही.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असेल तरीही, या अधिनियमाअन्वये शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध एखाद्या कंपनीने केला असेल आणि तो अपराध, कंपनीच्या संचालकाच्या, व्यवस्थापकाचय, सचिवाच्या किंवा इतर अधिकाऱ्याच्या संमतीने किंवा मुकसंमतीने केला आहे किंवा त्याच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे असे सिद्ध करण्यात आले असेल. त्याबाबतीत, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर अधिकारी, त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि ते देखील त्यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जाण्यास व त्यानुसार शिक्षा होण्यास पात्र असतील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ,-
(a)क) कंपनी याचा अर्थ, कोणताही निगम निकाय असा असून त्यामध्ये एखाद्या भागीदारी संस्थेचा किंवा इतर व्यक्तिसंघाचा समावेश होतो, आणि
(b)ख) एखाद्या भागीदारी संस्थेच्या संबंधातील संचालक याचा अर्थ, भागीदारी संस्थेमधील एखादा भागीदार, असा आहे.