Pcpndt act कलम १८ : आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी :

गर्भधारणा-पूर्व व प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम १९९४
प्रकरण ६ :
आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी :
कलम १८ :
आनुवंशिकीय समुपदेशन केंद्रे, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालये यांची नोंदणी :
१.(१) कोणतीही व्यक्ती, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रे ( विनियमन व गैरवापरास प्रतिबंध ) सुधारणा अधिनियम, २००२ (२००३ चा १४) याच्या प्रारंभानंतर, स्वनातीत किंवा प्रतिमादर्शक यंत्र किंवा क्रमवीक्षक यंत्र किंवा गर्भ लिंगनिर्धारण किंवा लिंग निवड करु शकणारे किंवा त्यापैकी कशाचीही सेवा देणारे चिकित्सालय, प्रयोगशाळा किंवा केंद्र यांसह कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा आणि आनुवंशिकीय चिकित्सालय, यांची त्या अधिनियमान्वये रीतसर नोंदणी केल्याशिवाय असे कोणतेही केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय सुर करणार नाही.)
२) पोटकलम (१) अन्वये नोंदणीसाठी केलेला प्रत्येक अर्ज, विहित करण्यात येईल अशा नमुन्यात आणि अशा रीतीने, समुचित प्राधिकरणाकडे करण्यात येईल आणि त्यासोबत विहित करण्यात येईल अशी फी देण्यात येईल.
३) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी कलम ४ मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्राबाबत समुपदेशन करण्याच्या किंवा त्या तंत्रांचे संचालन करण्याच्या कामात अंशत: किंवा पुर्णत: गुंतलेले प्रत्येक आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय, अशा प्रारंभाच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत नोंदणीसांठी अर्ज करील.
४) कलम ६ च्या तरतुदींना अधीन राहून, प्रसव-पूर्व रोगनिदान तंत्रांबाबत समुपदेशन करणारे किंवा त्यांचे संचालन करणारे प्रत्येक आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकिस्तालय नोंदणीसाठी अर्ज करुन स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे त्यांची नोंदणी करण्यात आली नसेल तर, या अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर किंवा असा अर्ज निकालात काढण्यात येईपर्यंत, यांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत असे प्रत्येक केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय असे कोणतेही समुपदेशन करण्याचे किंवा तंत्र वापरण्याचे बंद करील.
५) कोणतेही आनुवंशिकीय समुपदेशन केंद्र, आनुवंशिकीय प्रयोगशाळा किंवा आनुवंशिकीय चिकित्सालय, विहित केल्या असतील अशा सुविधा पुरविण्याच्या,अशी उपकरणे बाळगण्याच्या व असा दर्जा सांभाळण्याच्या स्थितीत आहे याबाबत खात्री झाल्याशिवाय, समुचित प्राधिकरण या अधिनियमाअन्वये असे समुपदेशन केंद्र, प्रयोगशाळा किंवा चिकित्सालय यांची नोंदणी करणार नाही.
———
१. सन २००३ चा अधिनियम क्रमांक १४, कलम १७ द्वारे पोटकलम (१) ऐवजी दाखल करण्यात आला (१४ फेब्रुवारी २००३ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply