बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम ३ :
विवाहपक्ष बालक असल्यास त्याच्या विकल्पानुसार तो बाल-विवाह शून्यकरणीय असणे :
(१) प्रत्येक बालविवाह, – मग तो या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा प्रारंभानंतर विधिसंपन्न झालेला असो, – विवाहाच्या वेळी जो पक्षकार बाल होता त्याच्या विकल्पानुसार शून्य ठरविण्यात येईल :
परंतु विलोपनाच्या हुकूमनाम्याद्वारे बाल विवाह विलोपित करण्याचा अर्ज, विवाहाच्या वेळी जो पक्षकार बाल होता, अशा पक्षकाराद्वारेच केवळ, जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करता येईल.
(२) अर्ज दाखल करतेवेळी अर्जदार अज्ञानी असेल तर, त्याच्या किंवा तिच्या पालकांमार्फत किंवा बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यासह नजीकच्या मित्रामार्फत अर्ज दाखल करता येईल.
(३) या कलमाखालील अर्ज, कोणत्याही वेळी; परंतु अर्ज दाखल करणारे सज्ञानत्व पूर्ण केल्यावर दोन वर्षे पूर्ण करण्यापूर्वी दाखल करता येईल.
(४) या कलमान्वये विलोपनाचा हुकूमनामा देतेवेळी, जिल्हा न्यायालय, विवाहातील दोन्ही पक्षकारांना, मात्यापित्यांना किंवा त्यांच्या पालकांना दुसऱ्या बाजूकडून मिळालेला पैसा, मौल्यवान वस्तू, दागिने व अन्य भेटवस्तू किंवा अशा मौल्यवान वस्तूंच्या, दागिन्यांच्या, अन्य भेटवस्तूंच्या व पैशांच्या इतकी रक्कम दुसऱ्या पक्षास, त्याच्या किंवा तिच्या मातापित्यास किंवा यथास्थिती पालकास परत करण्याचा निदेश देणारा आदेश काढील :
परंतु, या अधिनियमाखालील कोणताही आदेश, संबंधित पक्षकारांस जिल्हा न्यायालयासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटीस देण्यात आल्याशिवाय आणि असा आदेश का काढण्यात येऊ नये याची कारणे दर्शविण्याची संधी दिल्या शिवाय, काढण्यात येणार नाही.