बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६
कलम १३ :
बालविवाहास प्रतिबंध करणारा मनाईहुकूम काढण्याचा न्यायालयाचा अधिकार :
(१) या अधिनियमात अंतर्भूत असलेला कोणत्याही गोष्टीविरूद्ध असली तरीही, बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने केलेल्या अर्जावरून किंवा तक्रारदाराकडून किंवा अन्यथा कोणत्याही व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीवरून, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची किंवा महानगर दंडाधिकाऱ्याची या अधिनियमाचे उल्लंघन करून बालविवाह करण्यात आला आहे किंवा विधिपूर्वक संपन्न होणार आहे अशी खात्री पटली असेल तर, असा दंडाधिकारी, अशा विवाहास प्रतिबंध करण्यासाठी संघटनेच्या किंवा व्यक्तींच्या अधिसंघाच्या सदस्यासह कोणत्याही व्यक्तीविरूद्ध मनाईहुकूम काढील.
(२) बालविवाह किंवा बालविवाह घडून येणार असल्याचा संभव असल्यासंबंधी वैयक्तिक माहिती असणारी किंवा तसा विश्वास ठेवण्यात कारण असणारी कोणतीही व्यक्ती, किंवा वाजवी माहिती असणारी अशासकीय संघटना, पोटकलम (१) खाली तक्रार करू शकते.
(३) प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी देखील कोणत्याही विश्वसनीय अहवालाच्या किंवा माहितीच्या आधारे, स्वाधिकारे दखल घेऊ शकेल.
(४) अक्षयतृतीया यांसारख्या काही दिवशी सामूहिक बालविवाह होण्यास प्रतिबंध करण्याच्या प्रयोजनार्थ, जिल्हा दंडाधिकारी हा या अधिनियमाद्वारे किंवा त्याअन्वये बाल विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यास प्रदान केलेल्या सर्व अधिकारांसह बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असल्याचे मानण्यात येईल.
(५) जिल्हा दंडाधिकाऱ्यास, बालविवाह थांबविण्यासाठी किंवा त्यास प्रतिबंध करण्यासाठी अतिरिक्त अधिकार देखील असतील आणि या प्रयोजनार्थ, तो यथोचित सर्व उपाययोजना हाती घेऊ शकेल आणि आवश्यक असेल अशा किमान बळाचा वापर करू शकेल.
(६) न्यायालयाने, कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही संघटनेच्या किंवा व्यक्तींच्या अधिसंघाच्या सदस्यास पूर्वनोटीस दिल्याशिवाय आणि त्याच्याविरूद्ध मनाईहुकूम का काढू नये यासंबंधात त्याला किंवा त्यांना कारणे देण्याची संधी दिल्याशिवाय अशा व्यक्तीविरूद्ध किंवा संघटनेच्या किंवा व्यक्तीसंघाच्या सदस्याविरूद्ध, पोटकलम (१) अन्वये मनाईहुकूम काढण्यात येणार नाही :
परंतु, कोणत्याही तातडीच्या बाबतीत, न्यायालयास या कलमान्वये कोणतीही नोटीस न देता, अंतरिम मनाईहुकूम काढण्याचा अधिकार असेल.
(७) पोटकलम (१) अन्वये काढलेला मनाईहुकूम तिच्याविरूद्ध मनाईहुकूम काढला होता, त्या व्यक्तीस नोटीस दिल्यानंतर आणि तिची सुनावणी घेतल्यानंतर कायम होऊ शकेल किंवा रद्द करण्यात येऊ शकेल.
(८) न्यायालय, एकतर त्याच्या स्वत:च्या प्रस्तावावरून किंवा व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीच्या अर्जावरून, पोटकलम (१) अन्वये काढलेला मनाईहुकूम रद्द करू शकेल किंवा त्यात फेरबदल करू शकेल.
(९) जेव्हा पोटकलम (१) खालील अर्ज मिळेल तेव्हा, न्यायालय अर्जदारास एकतर स्वत: किंवा वकिलाद्वारे त्याच्यासमोर उपस्थित राहण्याची पूर्वसंधी देईल आणि जर अर्जदाराची सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने अर्ज संपूर्णत: किंवा अंशत: फेटाळला असेल तर, ते तसे करण्याची त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदवील.
(१०) आपल्याविरूद्ध पोटकलम (१) अन्वये मनाईहुकूम काढण्यात आला आहे, याची माहिती असताना जी कोणी व्यक्ती, अशा मनाईहुकूमाचे पालन करणार नाही अशी व्यक्ती, दोन वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही वर्णनाच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा एक लाख रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या दंडाच्या शिक्षेस किंवा या दोन्हीही शिक्षेस पात्र असेल :
परंतु, कोणत्याही महिलेस कारावासाची शिक्षा होणार नाही.