राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम १९८०
कलम १५ :
स्थानबद्ध व्यक्तीची तात्पुरती मुक्तता :
(१) समुचित शासनाला, कोणत्याही वेळी असा निर्देश देता येईल की, एखाद्या स्थानबद्धता आदेशानुसार स्थानबद्ध करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची बिनशर्त किंवा त्या निदेशात विनिर्दिष्ट करण्यात आल्या असतील अशा त्या व्यक्तीने स्वीकारलेल्या शर्तीवर, कोणत्याही विनिर्दिष्ट कालावधीसाठी मुक्तता करता येईल आणि त्यास कोणत्याही वेळी त्याची मुक्तता रद्द करता येईल.
(२) पोटकलम (१) अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या मुक्ततेचा निदेश देताना, समुचित शासन त्या निदेशामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीच्या यथोचित पालनासाठी, त्या व्यक्तीला जामिनासह किंवा जामिनाशिवाय बंधपत्र करून देण्यास भाग पाडू शकेल.
(३) पोटकलम (१) अन्वये मुक्त करण्यात आलेली कोणतीही व्यक्ती, तिच्या मुक्ततेच्या, किंवा प्रकरणपरत्वे, मुक्तता रद्द केल्याचा निदेश देणाऱ्या आदेशात विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या वेळी आणि ठिकाणी प्राधिकाऱ्याच्या स्वाधीन होईल.
(४) एखादी व्यक्ती, पुरेशा कारणाशिवाय पोटकलम (३) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने स्वाधीन होण्यात कसूर करील तर तिला दोन वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा देण्यात येतील.
(५) पोटकलम (१) अन्वये मुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीने, उक्त पोटकलमान्वये किंवा तिने करून दिलेल्या बंधपत्राद्वारे तिच्यावर लादण्यात आलेल्या शर्तींपैकी कोणतीही शर्त पूर्ण करण्यात कसूर केली तर, ते बंधपत्र समपहृत झाले असल्याचे घोषित करण्यात येईल आणि त्याद्वारे बांधील असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्याबद्दल शास्ती भरावी लागेल.