JJ act 2015 कलम ५३ : या अधिनियमान्वये नोंदणीकृत संस्थेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या बालकाचे पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासंबंधी सेवा व त्यांचे व्यवस्थापन :

बाल न्याय अधिनियम २०१५
कलम ५३ :
या अधिनियमान्वये नोंदणीकृत संस्थेमध्ये पुरविल्या जाणाऱ्या बालकाचे पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासंबंधी सेवा व त्यांचे व्यवस्थापन :
१) या अधिनियमान्वये बालकाच्या पुनर्वसन आणि सामाजिक एकजीवीकरणासाठी, नोंदविल्या गेलेल्या संस्थांमध्ये ठरावीक पद्धतीने पुरविल्या जाणाऱ्या सेवांमध्ये खालील सेवा अंतर्भूत असतील,-
एक) ठरवून दिलेल्या दर्जाच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय मूलभूत गरजा;
दोन) विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी व्हिल चेअर, विकलांग आधार साहित्य, श्रवणयंत्र, ब्रेल लिपी संच आणि इतर कोणतेही आवश्यक साहित्य व अवजारे;
तीन) विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी योग्य शिक्षण, त्यात पूरक शिक्षक, विशेष शिक्षण यांचाही समावेश असेल :
परंतु असे की, सहा ते चौदा वर्षांमधील वयाच्या बालकांसाठी, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ मधील तरतुदी लागू होतील;
चार) कौशल्य विकास;
पाच) व्यावसायिक उपचार आणि जीवन कौशल्य शिक्षण;
सहा) बालकाच्या गरजेनुसार समुपदेशन आणि आवश्यक मानसिक आरोग्य हस्तक्षेप;
सात) खेळाचे साहित्य आणि खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम;
आठ) आवश्यकतेनुसार कायदेविषयक साहाय्य;
नऊ) शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, आवश्यकतेनुसार व्यसनमुक्ती आणि रोगांवरील उपचार;
दहा) व्यक्तिगत संगोपन योजनेसारखे आवश्यक व्यक्तिगत व्यवस्थापन;
अकरा) जन्म नोंदणी;
बारा) ओळखपत्रासाठी आवश्यक नोंदी करण्यासाठी सहाय्य;
तेरा) बालकाच्या कल्याणासाठी आवश्यक असलेल्या व सामान्यरीत्या परस्पर राज्य सरकार, नोंदणीकृत किंवा योग्य व्यक्ती किंवा संस्था किंवा संपर्क सेवा यांच्यामार्फत पुरवल्या जातील अशा सेवा.
२) प्रत्येक संस्थेमध्ये, संस्थेच्या व्यवस्थापनासाठी व प्रत्येक बालकाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी विहित केलेल्या पद्धतीने नेमलेली एक व्यवस्थापन समिती असेल.
३) सहा वर्षावरील बालकांची निवासी व्यवस्था असलेल्या संस्थेचे प्रभारी अधिकारी, संस्थेमार्फत बालकांचे कल्याण आणि सुरक्षितता यामध्ये सहभाग घेण्यासाठी विहित केलेल्या पद्धतीने एक बाल समिती निर्माण करतील.

Leave a Reply