भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४७३ :
अन्यथा शिक्षापात्र असलेले बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने नकली मोहोर, इत्यादी बनवणे किंवा कब्जात बाळगणे :
(See section 341(2) of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : भारतीय दंड संहितेच्या कलम ४६७ खाली नव्हेत तर अन्यथा शिक्षापात्र असे बनावटीकरण करण्याच्या उद्देशाने मोहोर, मुद्रापट्ट, इत्यादी बनवणे किंवा नकली तयार करणे अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट्ट नकली असल्याचे माहीत असताना तशाच उद्देशाने ते जवळ बाळगणे.
शिक्षा :७ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय :प्रथम वर्ग दंडाधिकारी.
——-
जर कोणी एखादी मोहोर, मुद्रापट्ट किंवा ठसा उमटवण्याचे अन्य साधन बनवले किंवा नकली तयार केले आणि या प्रकरणातील कलम ४६७ हून अन्य कोणत्याही कलमान्वये शिक्षापात्र होऊ शकेल असे कोणतेही बनावटीकरण करण्यासाठी त्याचा वापर करावा असा त्यामागे त्याचा उद्देश असेल अथवा अशी कोणतीही मोहोर, मुद्रापट किंवा अन्य साधन नकली असल्याचे माहीत असून, त्याने तशा उद्देशाने ते कब्जात बाळगले तर, त्याला सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.