Ipc कलम ४६४ : खोटा दस्तऐवज तयार करणे :

भारतीय दंड संहिता १८६०
कलम ४६४ :
खोटा दस्तऐवज तयार करणे :
(See section 335 of BNS 2023)
१.(एखादी व्यक्ती,—
जी एखादा दस्तऐवज किंवा दस्तऐवजाचा भाग किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा २.(इलेक्ट्रॉनिक सही) एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या प्राधिकारान्वये तयार करण्यात, त्यावर सही करण्यात, तो मुद्रांकित करण्यात, निष्पादित करण्यात किंवा त्यावर २.(इलेक्ट्रॉनिक सही) करण्यात आली नसल्याचे स्वत:ला माहीत असताना तो तसा तयार केला, स्वाक्षरित केला, मुद्रांकित केला निष्पादित केला त्यावर २.(इलेक्ट्रॉनिक सही) केली यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने,
एक : अप्रामाणिकपणाने किंवा कपटीपणाने–
(अ) एखादा दस्तऐवज किंवा दस्तऐवजाचा भाग तयार करील, त्यावर सही करील, तो मुद्रांकित करील किंवा निष्पादिन करील;
(ब) एखादा इलेक्ट्रॉनिक अभिलेख किंवा त्याचा भाग तयार करील किंवा पारेषित करील;
(क) कोणत्याही इलेकक्टड्ढॉनिक अभिलेखावर २.(इलेटड्ढॉनिक सही) करील;
(ड) दस्तऐवजांचे निष्पादन किंवा २.(इलेटड्ढॉनिक सही) चा अधिकृतपणा दर्शविणारी कोणतीही खूण करील;किंवा
दोन : जी, एखादा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख यात त्याचा कोणत्याही महत्वाच्या भागात, तो तयार करण्यात आल्यावर किंवा त्याने स्वत: किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने त्यावर डिजीटल सही केल्यावर– मग अशी दुसरी व्यक्ती फेरफाराच्या वेळी जिवंत असो वा मृत असो– कोणताही कायदेशीर प्राधिकार नसताना, रद्द करणे किंवा अन्य प्रकारे फेरफार करणे या गोष्टी अप्रामाणिकपणाने व कपटाने करील; किंवा
तीन : जी, एखाद्या दस्तऐवजात किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखात त्यातील आशय किंवा केलेल्या फेरफारांचे स्वरुप जिला तिच्या मनोविकलतेमुळे किंवा नशेत असल्यामुळे किंवा तिची फसवणूक केल्यामुळे समजू शकणार नाही, अशा एखाद्या व्यक्तीला त्या दस्तऐवजावर किंवा इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजावर सही करण्यास, तो मुद्रांकित करण्यास, निष्पादित करण्यास किंवा त्यात फेरफार करण्यास किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेखावर डिजीटल सही करण्यास अप्रामाणिकपणाने किंवा कपटाने किंवा भाग पाडील, तिने खोटा दस्तऐवज किंवा इलेक्ट्रॉनिक अभिलेख केला असे म्हटले जाते.)
उदाहरणे :
क) (य) ने (ख) वर काढलेले १०,००० रु. चे पतपत्र (क) कडे आहे. (ख) ला गंडवण्यासाठी (क) १०,००० वर एक पूज्य चढवतो आणि ते पतपत्र (य) ने तसे लिहिलेले आहे असा (ख) चा समज व्हावा या उद्देशाने ती रक्कम १,००,००० रु अशी करतो. (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
ख) (य) ने (क) ला एका संपदेचे अभिहस्तांतरण केले आहे असे दाखवणाऱ्या दस्तऐवजाववर (ख) ला ती संपदा विकून त्याद्वारे (ख) कडून खरेदीची किंमत मिळवावी या उद्देशाने (क) हा (य) च्या प्राधिकारावाचून (य) ची माहोर लावतो. (क) ने बनावटीकरण केले आहे.
ग) एका बैंकरवर काढलेला धारणकत्र्याला प्रदेय असा (ख) च्या स्वाक्षरीचा, पण काहीही रक्कम न भरलेला असा धनादेश (क) लांबवतो. (क) कपटीपणाने त्या धनादेशात दहा हजार रुपयाचा आकडा घालून पूर्ण करतो. (क) बनावटीकरण करतो.
घ) प्रदेय रक्कम किती ते न भरता एका बैंकरच्या नावावर काढलेला आपल्या सहीचा एक धनादेश (क) आपला अभिकर्ता (ख) याच्या स्वाधीन करतो आणि विवक्षित रकमा चुकत्या करण्यासाठी दहा हजार रुपयांपेक्षा अधिक नाही इतका आकडा भरुन धनादेश पूर्ण करण्यास (ख) ला प्राधिकृत करतो. (ख) कपटीपणाने वीस हजार रुपयांचा आकडा घालून धनादेश पूर्ण करतो. (ख) बनावटीकरण करतो.
ङ) (क) स्वत:प्रीत्यर्थ (ख) च्या नावाने पण (ख) च्या प्राधिकारावाचून एक विपत्र काढतो. ते खरे विपत्र असल्याप्रमाणे बैंकरकडे वटवण्याचा त्याचा उद्देश असून, विपत्र परिपक्व होताच त्याचची रक्कम वसूल करण्याचा त्याचा इरादा आहे. (क) हा आपल्याकडे (ख) चे तारण होते असा बैंकरचा समज करुन देऊन त्याची फसवणूक करण्याच्या आणि त्यायोगे ते विपत्र वटवण्याच्या उद्देशाने ते विपत्र काढतो, म्हणून (क) हा बनावटीकरणाबद्दल दोषी आहे.
च) (य) च्या मृत्युपत्रात असे शब्द आहेत – मी असे निदेशित करतो की, माझी सर्व उर्वरित मालमत्ता (क), (ख) आणि (ग) यांच्यामध्ये समसमान विभागली जावी. सर्व मालमत्ता आपल्यासाठी आणि (ग) साठी ठेवण्यात आली आहे असा समज व्हावा या उद्देशाने (क) हा (ख) चे नाव काढून टाकतो. (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
छ) (क) एक सरकारी वचनपत्र पृष्ठांकित करतो आणि त्या विपत्रावर (य) ला किंवा त्याच्या आदिष्टास द्यावे असे शब्द लिहून आणि पृष्ठांकन स्वाक्षरित करुन ते (य) ला किंवा त्याच्या आदिष्टास प्रदेय करतो. (ख) अप्रामाणिकपणाने (य) ला किंवा त्याच्या आदिष्टास द्यावे हे शब्द खोडून टाकतो आणि त्याद्वारे विशेष पृष्ठांकन कोऱ्या पृष्ठांकनामध्ये परिवर्तित करतो. (ख) बनावटीकरण करतो.
ज) (क) एक संपदा (य) ला विकून अभिहस्तांतरित करतो. त्यानंतर (य) कडून संपदा कपटाने हिरावून घेण्यासाठी (क) हा (य) ला तो संपददा अभिहस्तांतरित केल्याच्या तारखेच्या सहा महिने अगोदरच्या तारखेचे तीच संपदा (ख) ला देणारे अभिहस्तांतरणपत्र निष्पादित करतो. ती संपदा (य) कडे अभिहस्तांतरित करण्याच्या अगोदर त्याने ती (ख) कडे अभिहस्तांतरित केली होती असा समज व्हावा असा त्याचा उद्देश आहे. (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
झ) (य) स्वत:चे मृत्युपत्र (क) ला उतरुन घेण्यास सांगतो. (क) उद्देशपूर्वक (य) ने सांगितलेल्या उत्तरदानग्राहीच्या नावापेक्षा वेगळ्या उत्तरदानग्राहीचे नाव लिहितो आणि आपण ते मृत्युपत्र (य) च्या सूचनेबरहुकूम तयार केलेले आहे असे (य) ला अभिवेदन करुन त्याला मृत्युपत्रावर स्वाक्षरी करण्यास प्रवृत्त करतो. (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
ञ) (क) हा सच्छील मनुष्य असून अकल्पित दुर्देवामुळे तो विपन्नावस्थेस पोचला आहे असा हवाला देणारे पत्र लिहून (क) अशा पत्राच्या साहय्याने (य) कडून आणि इतर व्यक्तीकडून मदत मिळवावी या उद्देशाने, (ख) च्या प्राधिकाराशिवाय त्यावर (ख) च्या नावाची स्वाक्षरी करतो. याबाबतीत, ज्याअर्थी मालमत्तेचा कब्जा सोडून देण्यास (य) ला प्रवृत्त करण्यासाठी (क) ने खोटा दस्तऐवज बनवला आहे, त्याअर्थी (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
ट) (क) च्या चारित्र्याचा हवाला देणारे एक पत्र (क) हा (ख) च्या प्राधिकाराशिवाय लिहितो आणि त्यायोगे (य) कडे नोकरी मिळवावी या उद्देशाने त्यावर (ख) च्या नावाची स्वाक्षरी करतो. ज्याअर्थी, बनावट प्रमाणपत्र (य) ला फसवावे आणि त्यायोगे नोकरीची स्पष्ट किंवा उपलक्षित संविदा करण्यास त्याला प्रवृत्त करावे असा (क) चा उद्देश होता, त्याअर्थी त्याने बनावटीकरण केलेले आहे.
स्पष्टीकरण १ :
एखाद्या माणसाने केलेली स्वत:च्या नावाची स्वाक्षरी ही बनावटीकरण या सदरात जमा होऊ शकेल.
उदाहरणे :
क) (क) हा एका विनिमयपत्रावर स्वत:च्या नावाची, त्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने ते विपत्र काढले होते असा समज व्हावा या उद्देशाने स्वाक्षरी करतो. (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
ख) (क) एका कागदावर स्वीकृत असा शब्द लिहितो आणि (य) च्या नावाची स्वाक्षरी करतो, उद्देश असा की, (ख) ने (य) च्या नावावर काढलेले विनिमयपत्र (ख) ने नंतर त्या कागदावर लिहावे आणि जणू काही (य) ने ते स्वीकृत केलेले असावे त्याप्रमाणे ते परक्रामित करावे. (क) हा बनावटीकरणाबद्दल दोषी आहे, आणि जर (ख) ने सत्य माहीत असूनही (क) च्या उद्देशानुसार त्या कागदावर विनिमयपत्र लिहिले तर, (ख) सुद्धा बनावटीकरणाबद्दल दोषी होईल.
ग) (क) त्याच्याच नावाच्या दुसऱ्या व्यक्तीच्या आदिष्टास प्रदेय असलेले विनिमयपत्र लांबवतो. ते विपत्र ज्या व्यक्तीच्या आदिष्टास प्रदेय होते तिनेच ते पृष्ठांकित केले असा समज व्हावा या उद्देशाने (क) ते स्वत:च्या नावे पृष्ठांकित करतो. याबाबतीत, (क) ने बनावटीकरण केलेले आहे.
घ) (ख) विरुद्ध झालेल्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीत विक्रीला काढलेली संपदा (क) खरेदी करतो. संपदेच्या अभिग्रहणानंतर (ख) हा (क) ला गंडवावेह आणि अभिग्रहणापूर्वी संपदेचा भाडेपट्टा झाला होता असा समजज व्हावा या उद्देशाने (य) शी संगनमत करुन, (य) ला नाममात्र भाड्याने आणि दीर्घ मुदतीने संपदा देणारा भाडेपट्टा निष्पादित करतो व अभिग्रहणाच्या सहा महिने आधीची तारीख भाडेपट्ट्यावर घालतो. (ख) ने जरी स्वत:च्याच नावाने भाडेपट्टा निष्पादित केला असला तरी मागील तारीख टाकल्यामुळे त्याने बनावटीकरण केले असे होते.
ङ) दिवाळखोरीच्या पूर्वकल्पनेने (क) हा व्यापारी आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या धनकोंना गंडवण्याच्या उद्देशाने (ख) कडे जायदाद ठेवतो आणि त्या व्यवहाराला खरेपणाची छटा देण्यासाठी तो, मिळालेल्या मूल्याइतकी रक्कम (ख) ला देण्यासाठी स्वत:ला बांधून घेणारी एक वचनचिट्ठी लिहितो आणि (क) वर दिवाळखोर होण्याची पाळी येण्याअगोदरच त्याने ती लिहिली होती असा समज व्हावा या उद्देशाने त्यावर मागील तारीख घालतो. (क) ने व्याख्येच्या पहिल्या सदराखाली बनावटीकरण केलेले आहे.
स्पष्टीकरण २ :
एखादा खोटा दस्तऐवज खऱ्याखुऱ्या व्यक्तिने बनवला होता असा समज निर्माण व्हावा, या उद्देशाने कल्पित व्यक्तिच्या नावाने किंवा तो दस्तऐवज एखाद्या व्यक्तिने हयात असताना केला होता असा समज निर्माण व्हावा या उद्देशाने मृत व्यक्तिच्या नावाने तसा दस्तऐवज बनवणे हे बनावटीकरण या सदरात जमा होऊ शकेल.
उदाहरण :
(क) कल्पित व्यक्तीच्या नावावर एक विनिमयपत्र काढतो, आणि ते परक्रामित करण्याच्या उद्देशाने तो कपटीपणाने अशा व्यक्तीच्या नावाने ते विपत्र स्वीकारतो. (क) बनावटीकरण करतो.
३.(स्पष्टीकरण ३ :
या कलमाच्या प्रयाजनासाठी, २.(इलेक्ट्रॉनिक सही करणे) या संज्ञेला माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० (२००१ चा २१ ) याच्या कलम २ च्या पोटकलम (१) चा खंड (ड) मध्ये जो अर्थ दिला असेल तोच अर्थ असेल.)
——-
१. सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे विवक्षित शब्दांऐवजी समाविष्ट केले.
२.माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, २००८ (२००९ चा १०) कलम ५१ (इ) द्वारे डिजीटल सही एैवजी समाविवष्ट केले. (२७.१०.२००९ पासून)
३.सन २००० चा अधिनियम क्र. २१ याचे कलम ९१ व अनुसूचीद्वारे १७/१०/२००० पासून समाविष्ट केले.

Leave a Reply