भारतीय दंड संहिता १८६०
कलम १४० :
भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे:
(See section 168 of BNS 2023)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : आपण भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक आहोत असा समज व्हावा म्हणून असा भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतो तशी वर्दी परिधान करणे अथवा तसा कोणतेही ओळखचिन्ह जवळ बाळगणे.
शिक्षा :३ महिन्यांचा कारावास, किंवा ५०० रुपये द्रव्यदंड, किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी
———–
स्वत: १.(भारत सरकारच्या) भूसैनिकी, २.(नौसैनिकी, किंवा वायुसैनिकी) सेवेमधील भूसैनिक, २.(नौसैनिक किंवा वायुसैनिक) नसताना आपण असे भूसैनिक, २.(नौसैनिक किंवा वायुसैनिक) आहोत असा समज व्हावा या उद्देशाने जो कोणी असा भूसैनिक २.(,नौसैनिक किंवा वायूसैनिक) वापरतात तशासारखी कोणतीही वर्दी (गणवेष) परिधान करील अथवा तशासारखे कोणतेही ओळखचिन्ह जवळ बाळगील त्याला, तीन महिनेपर्यंंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाची कारावासाची किंवा पाचशे रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
———-
१. अनुकूलन आदेश १९५० द्वारा क्वीन याऐवजी दाखल करण्यात आले.
२. १९२७ चा अधिनियम १० – कलम २ व अनुसूची १ यांद्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केले.