सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम २५ :
कलमे ४ व ६ खालील अपराध्यांस प्रतिबंध, अटकावून ठेवणे आणि न्यायचौकशीचे ठिकाण :
(१) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र सरकारला किंवा राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाखाली कृती करण्यासाठी सक्षम म्हणून एका किंवा अनेक व्यक्तींना प्राधिकृत करता येईल :
परंतु असे की, अशा रीतीने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला, जर तिला असे मानण्यास वाजवी कारण असेल की, एखाद्या व्यक्तीने कलम ४ किंवा कलम ६ खालील अपराध केला आहे तर, अशा व्यक्तीस स्थानबद्ध करता येईल, मात्र आरोपी व्यक्तीने आपले नाव व पत्ता दिला आणि तिच्या विरूद्ध काढलेल्या समन्सला किंवा केलेल्या अन्य कार्यवाहीला ती रीतसर उत्तर देईल त्याबद्दल तिला अटकावून ठेवणाऱ्या अधिकाऱ्याची तिने अन्य प्रकारे खात्री पटवली तर तिला अटकावून ठेवले जाणार नाही.
(२) पोटकलम (१) अन्वये अटकावून ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीला, कायद्यानुसार तिच्यावर कार्यवाही करण्यासाठी ताबडतोब दंडाधिकाऱ्यांसमोर नेले जाईल.
(३) कलम ४ किंवा कलम ६ खालील अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची अशा अपराधांची न्यायचौकशी, ती व्यक्ती जेथे असेल त्या ठिकाणी किंवा राज्य शासन त्या संदर्भात अधिसुचित करील त्या ठिकाणी तसेच त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तिची ज्या इतर कोणत्याही ठिकाणी न्यायचौकशी होण्यास ती पात्र असेल अशा अन्य ठिकाणीही केली जाईल.
(४) पोटकलमे (१) व (३) अन्वये काढलेली प्रत्येक अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याची प्रत जनतेच्या माहितीसाठी, राज्य शासन निदेश देईल अशा एका किंवा अनेक ठळक जागी लावण्यात येईल.
(५) पोटकलम (१) अन्वये प्राधिकृत केलेली प्रत्येक व्यक्ती ही, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम २१ च्या अर्थांतर्गत लोकसेवक असल्याचे मानण्यात येईल.