Constitution अनुच्छेद ८१ : लोकसभेची रचना :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८१ :
लोकसभेची रचना :
१.((१)२.(अनुच्छेद ३३१ च्या ३.(***) तरतुदींना अधीन राहून) लोकसभा—-
(क) राज्यांमधील क्षेत्रीय मतदारसंघामधून प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेले ४.(पाचशे तीस.) पेक्षा अधिक नसलेले सदस्य, आणि
(ख) संघ राज्यक्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी, संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा रीतीने निवडलेले ५.(वीस)पेक्षा अधिक नसलेले सदस्य, यांची मिळून बनलेली असेल.
(२) खंड (१) चा उपखंड (क) याच्या प्रयोजनार्थ,—-
(क) लोकसभेत प्रत्येक राज्याला अशा रीतीने जागा वाटून देण्यात येतील की, त्या जागांची संख्या व त्या राज्याची लोकसंख्या यांचे गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर सर्व राज्यांच्या बाबतीत सारखेच असेल; आणि
(ख) प्रत्येक राज्य अशा रीतीने क्षेत्रीय मतदारसंघामध्ये विभागण्यात येईल की, प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या व त्यास वाटून दिलेल्या जागांची संख्या यांचे गुणोत्तर, व्यवहार्य असेल तेथवर, राज्यात सर्वत्र सारखेच असेल :
६.(परंतु असे की, एखाद्या राज्याची लोकसंख्या सहा दशलक्षांपेक्षा जास्त होत नाही तोवर, त्या राज्याला लोकसभेतील जागा वाटून देण्याच्या प्रयोजनार्थ, या खंडाच्या उपखंड (क) च्या तरतुदी लागू होणार नाहीत.)
(३) या अनुच्छेदात लोकसंख्या या शब्दप्रयोगाचा अर्थ, ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत अजमावलेली लोकसंख्या, असा आहे :
७.(परंतु असे की, या खंडातील ज्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित झालेली आहे अशा लगतपूर्व जनगणनेत या उल्लेखाचा अन्वयार्थ, सन ८.(२०२६) नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेची संबद्ध आकडेवारी प्रकाशित होईपर्यंत,
९.((एक) खंड (२) चा उपखंड (क) आणि त्या खंडाचे परंतुक यांच्या प्रयोजनासाठी, १९७१ सालच्या जनगणनेत ; आणि
(दोन) खंड (२) चा उपखंड (ख) याच्या प्रयोजनांसाठी १०.(२००१) सालच्या जनगणनेत,)असा लावला जाईल.))
——–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ४ द्वारे मूळ अनुच्छेद ८१ व ८२ याऐवजी दाखल केला.
२. संविधान (पस्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या कलम ४ द्वारे अनुच्छेद ३३१ च्या तरतुदींच्या अधीनतेने या मजकुराऐवजी दाखल केला (१ मार्च १९७५ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५ याच्या कलम ५ द्वारे आणि दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद ४ मधील हा मजकूर गाळला (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).
४. गोवा, दमण आणि दीव पुनर्रचना अधिनियम, १९८७ (१९८७ चा १८) याच्या कलम ६३ द्वारे पाचशे पंचवीस याऐवजी दाखल केला (३० मे १९८७ रोजी व तेव्हापासून).
५. संविधान (एकतिसावी सुधारणा) अधिनियम, १९७३ याच्या कलम २ द्वारे पंचवीस या शब्दाऐवजी दाखल केला.
६. संविधान (एकतिसावी सुधारणा) अधिनियम, १९७३ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केले.
७. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम १५ द्वारे समाविष्ट केले (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
८. संविधान (चौऱ्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००१ याच्या कलम ३ द्वारे २००० ऐवजी दाखल केले.
९. वरील अधिनियमाच्या कलम ३ द्वारे विवक्षित मजकुराऐवजी दाखल केले.
१०. संविधान (सत्त्याऐंशीवी सुधारणा) अधिनियम, २००३ याच्या कलम २ द्वारे १९९१ ऐवजी दाखल केले.

Leave a Reply