भारताचे संविधान ( राज्यघटना )
मंत्रिपरिषद
अनुच्छेद ७४ :
राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद :
१.((१) राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रिपरिषद असेल जिच्या प्रमुखपदी प्रधानमंत्री असेल आणि राष्ट्रपती आपली कार्ये पार पाडताना अशा सल्ल्यानुसार वागेल 🙂
२.(परंतु असे की, राष्ट्रपती, मंत्रिपरिषदेला अशा सल्ल्याचा सर्वसाधारणपणे किंवा अन्यथा फेरविचार करण्यास सांगू शकेल, आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार वागेल.)
(२) मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या प्रश्नाबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.
———————
१ संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम १३ द्वारे मूळ खंड (१) ऐवजी दाखल केले (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).
२ संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम ११ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).