Constitution अनुच्छेद ३५३ : आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३५३ :
आणीबाणीच्या उद्घोषणेचा परिणाम :
जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा,—-
(क) या संविधानात काहीही असले तरी, कोणत्याही राज्यास त्याने आपल्या कार्यकारी अधिकाराचा वापर कोणत्या रीतीने करावा त्यासंबंधी निदेश देणे, हे संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या कक्षेत येईल ;
(ख) कोणत्याही बाबीसंबंधी कायदा करण्याच्या संसदेच्या अधिकारात, ती बाब संघ सूचीत नमूद केलेली नसली तरीही तिच्याबाबत संघराज्य किंवा संघराज्याचे अधिकारी आणि प्राधिकारी यांना अधिकार प्रदान करणारे व त्यांना कर्तव्ये नेमून देणारे किंवा अधिकार प्रदान करणे व कर्तव्ये नेमून देणे, हे प्राधिकृत करणारे कायदे करण्याचा अधिकार समाविष्ट असेल :
१.(परंतु असे की, जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त एखाद्याच भागामध्ये अंमलात असेल तेव्हा,—-
(एक) खंड (क) अन्वये निदेश देण्याचा संघराज्याचा कार्यकारी अधिकार, आणि
(दोन) खंड (ख) अन्वये कायदे करण्याचा संसदेचा अधिकार, भारताच्या राज्यक्षेत्रातील ज्या भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेथील किंवा त्याच्या संबंधातील हालचालीमुळे भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत, ज्या राज्यामध्ये किंवा ज्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल त्याहून अन्य कोणत्याही राज्यामध्ये देखील लागू होईल.)
———–
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम ४९ द्वारे हे परंतुक समाविष्ट केले (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून).

Leave a Reply