Constitution अनुच्छेद ३४१ : अनुसूचित जाती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४१ :
अनुसूचित जाती :
१) राष्ट्रपतीला २.(कोणत्याही राज्याच्या ३.(किंवा संघ राज्यक्षेत्राच्या ) बाबतीत, आणि ते १.(***) राज्य असेल तर त्याच्या राज्यपालाशी ४.(***) विचारविनिमय केल्यानंतर,) जाहीर ५.(अधिसूचनेद्वारे त्या राज्याच्या ३.(किंवा, यथास्थिति, संघ राज्यक्षेत्राच्या) संबंधात या संविधानाच्या प्रयोजनार्थ, अनुसूचित जाती म्हणून मानल्या जातील त्या जाती, वंश किंवा जनजाती अथवा जाती, वंश किंवा जनजाती यांचे भाग किंवा त्यातील गट विनिर्दिष्ट करता येतील.
(२) संसदेला, कायद्याद्वारे, कोणतीही जात, वंश किंवा जनजाती अथवा कोणतीही जात, वंश किंवा जनजाती यांचा भाग किंवा त्यातील गट, खंड (१) अन्वये काढलेल्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जातींच्या सूचीत समाविष्ट करता येईल किंवा तीमधून वगळता येईल, पण उक्त खंडान्वये काढलेल्या अधिसूचनेत नंतरच्या कोणत्याही अधिसूचनेद्वारे पूर्वोक्तानुसार असेल त्यापेक्षा अन्यथा फरक केला जाणार नाही.
————–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात उल्लेखिलेल्या हा मजकूर गाळला.
२. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९५१ याच्या कलम १० द्वारे राज्याचा राज्यपाल किंवा राजप्रमुख याचा विचार घेतल्यानंतर याऐवजी हा मजकूर दाखल केला.
३. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे हा मजकूर समाविष्ट केला.
४. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुखाचा हा मजकूर गाळला.
५. संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० (संविधान आदेश १९), संविधान (अनुसूचित जाती) (संघ राज्यक्षेत्रे) आदेश, १९५१ (संविधान आदेश ३२), संविधान (जम्मू व काश्मिर) अनुसूचित जाती आदेश, १९५६ (संविधान आदेश ५२), संविधान (दादरा व नगरहवेली) अनुसूचित जाती आदेश, १९६२ (संविधान आदेश ६४), संविधान (पुडुचेरी) अनुसूचित जाती आदेश, १९६४ (संविधान आदेश ६८), संविधान (गोवा, दमण व दीव) अनुसूचित जाती आदेश, १९६८ (संविधान आदेश ८१) आणि संविधान (सिक्कीम) अनुसूचित जाती आदेश, १९७८ (संविधान आदेश ११०) पहा.

Leave a Reply