Constitution अनुच्छेद २४३-प : नगरपालिकांचा कालावधी, इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-प :
नगरपालिकांचा कालावधी, इत्यादी :
(१) प्रत्येक नगरपालिका, त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याअन्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर, तिच्या पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून पाच वर्षांपर्यंत अस्तित्वात राहील, त्यापेक्षा अधिक काळ नाही :
परंतु असे की, नगरपालिकेचे विसर्जन करण्यापूर्वी, तिला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देण्यात येईल.
(२) त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामधील कोणतीही सुधारणा, अशा सुधारणेच्या लगतपूर्वी कार्यरत असलेल्या कोणत्याही पातळीवरील कोणत्याही नगरपालिकेचे विसर्जन करण्याकरिता कारणीभूत होण्याच्या दृष्टीने, खंड (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला तिचा कालावधी समाप्त होईपर्यंत प्रभावी होणार नाही.
(३) एखादी नगरपालिका घटित करण्यासाठीची निवडणूक,
(क) खंड (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेला तिचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी ;
(ख) तिचे विसर्जन झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी, पूर्ण करण्यात येईल :
परंतु असे की, ज्या कालावधीसाठी विसर्जित नगरपालिका चालू राहिली असती तो उर्वरित कालावधी सहा महिन्यांपेक्षा कमी असेल त्या बाबतीत, अशा कालावधीसाठी नगरपालिका घटित करण्याकरिता या खंडाअन्वये कोणतीही निवडणूक घेण्याची आवश्यकता असणार नाही.
(४) एखाद्या नगरपालिकेचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी तिचे विसर्जन झाल्यामुळे घटित करण्यात आलेली नगरपालिका ही, जर विसर्जित नगरपालिकेचे विसर्जन झाले नसते तर, खंड (१) अन्वये ज्या उर्वरित कालावधीसाठी ती नगरपालिका अस्तित्वात राहिली असती, तेवढ्याच उर्वरित कालावधीसाठी अस्तित्वात राहील.

Leave a Reply