Constitution अनुच्छेद २४३-ध : प्रभाग समित्या घटित करणे व त्यांची रचना, इत्यादी :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ध :
प्रभाग समित्या घटित करणे व त्यांची रचना, इत्यादी :
(१) तीन लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिकांच्या प्रादेशिक क्षेत्रामध्ये, एका किंवा अधिक प्रभागांचा समावेश असलेल्या प्रभाग समित्या घटित करण्यात येतील.
(२) राज्य विधानमंडळ, कायद्याद्वारे,
(क) प्रभाग समित्यांची रचना व त्यांचे प्रादेशिक क्षेत्र ;
(ख) प्रभाग समितीमधील जागा ज्या रीतीने भरावयाच्या ती रीत, या संबंधात तरतूद करू शकेल.
(३) प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्रामधील प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारा नगरपालिका सदस्य हा, त्या समितीचा सदस्य असेल.
(४) जेव्हा प्रभाग समिती,
(क) एका प्रभागाची मिळून बनलेली असेल अशा बाबतीत, त्या प्रभागाचे नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणारा सदस्य ; किंवा
(ख) दोन किंवा अधिक प्रभागांची मिळून बनलेली असेल अशा बाबतीत, अशा प्रभागांचे नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांमधून प्रभाग समितीच्या सदस्यांनी निवडला असेल असा एक सदस्य, हा त्या समितीचा अध्यक्ष असेल.
(५) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे, प्रभाग समित्यांव्यतिरिक्त आणखी कोणत्याही समित्या घटित करण्यासाठी कोणतीही तरतूद करण्यास राज्य विधानमंडळास प्रतिबंध होतो, असे मानण्यात येणार नाही.

Leave a Reply