भारताचे संविधान ( राज्यघटना )
सर्वसाधारण कार्यपद्धती :
अनुच्छेद २०८ :
कार्यपद्धतीचे नियम :
(१) या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्य विधानमंडळाच्या सभागृहास, आपली कार्यपद्धती १.(***) आणि आपले कामकाज चालविणे यांचे विनियमन करण्याकरता नियम करता येतील.
(२) खंड (१) अन्वये नियम केले जाईपर्यंत, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी तेथील संबंधित असलेल्या प्रांताच्या विधानमंडळाबाबत अंमलात असलेले कार्यपद्धतीचे नियम व स्थायी आदेश हे, विधानसभेचा अध्यक्ष, किंवा यथास्थिति, विधानपरिषदेचा सभापती त्यात जे फेरबदल व अनुकूलन करील त्यांसह राज्य विधानमंडळाच्या संबंधात प्रभावी असतील.
(३) विधानपरिषद असलेल्या राज्यांमध्ये राज्यपालाला, विधानसभेचा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचा सभापती यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर, दोन्ही सभागृहांमधील परस्पर संपर्काबाबतच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम करता येतील.
———
१. संविधान (बेचाळीसावे संशोधन) अधिनियम १९७६ याच्या कलम ३५ द्वारा (ज्याच्या अंतर्गत सभागृहाची बैठक गठीत करण्यासाठी गणपूर्तीसह) हे अंक व शब्द (तारीख अधिसूचित केलेली नाही) घातले. हे संशोधन (२०-६-१९७९ पासून) संविधान (चव्वेचालीसावे संशोधन) अधिनियम १९७८ च्या कलम ४५ द्वारे वगळण्यात आले.