भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८१ :
अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्षस्थान न स्वीकारणे :
(१) विधानसभेच्या कोणत्याही बैठकीत, अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, अध्यक्ष, अथवा उपाध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना, उपाध्यक्ष, स्वत: उपस्थित असला तरी, अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही, आणि अनुच्छेद १८० च्या खंड (२) च्या तरतुदी, जशा त्या, अध्यक्ष किंवा, यथास्थिति, उपाध्यक्ष अनुपस्थित असलेल्या बैठकीच्या संबंधात लागू होतात, तशा त्या पूर्वोक्त अशा प्रत्येक बैठकीच्या संबंधात लागू होतील.
(२) अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विधानसभेत विचाराधीन असताना, त्याला विधानसभेमध्ये भाषण करण्याचा व तिच्या कामकाजात अन्यथा भाग घेण्याचा हक्क असेल आणि अनुच्छेद १८९ मध्ये काहीही असले तरी, असे कामकाज चालू असताना अशा ठरावावर किंवा अन्य कोणत्याही बाबीवर फक्त पहिल्याच फेरीत मतदान करण्याचा त्याला हक्क असेल, पण मते समसमान झाल्यास मात्र नाही.