भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ११४ :
विनियोजन विधेयके :
(१) लोकसभेने, अनुच्छेद ११३ अन्वये अनुदाने मंजूर केल्यानंतर, होईल तितक्या लवकर,—–
(क) लोकसभेने याप्रमाणे मंजूर केलेली अनुदाने ; आणि
(ख) भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला, पण कोणत्याही बाबतीत, संसदेसमोर अगोदर ठेवलेल्या विवरणपत्रात दाखवलेल्या खर्चाहून जो अधिक असणार नाही असा खर्च, भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पैशांचे भारताच्या एकत्रित निधीतून विनियोजन करण्याची तरतूद करण्यासाठी एक विधेयक प्रस्तुत केले जाईल.
(२) ज्या सुधारणेच्या परिणामी याप्रमाणे मंजूर करण्यात आलेल्या कोणत्याही अनुदानाची रक्कम कमीअधिक होईल किंवा त्यांच्या पूर्वोद्दिष्टात फेरफार होईल किंवा भारताच्या एकत्रित निधीवर भारित केलेल्या कोणत्याही खर्चाची रक्कम कमीअधिक होईल अशी कोणतीही सुधारणा, संसदेच्या दोहोंपेकी कोणत्याही सभागृहात अशा कोणत्याही विधेयकाला प्रस्तावित केली जाणार नाही आणि या खंडान्वये एखादी सुधारणा अग्राह्य आहे किंवा कसे यासंबंधात, अध्यक्षस्थानी असणाऱ्या व्यक्तीचा निर्णय अंतिम असेल.
(३) अनुच्छेद ११५ व ११६ यांच्या तरतुदींना अधीन राहून, या अनुच्छेदाच्या तरतुदींच्या अनुसार पारित झालेल्या कायद्याद्वारे विनियोजन केले असल्याखेरीज, भारताच्या एकत्रित निधीतून कोणताही पैसा काढला जाणार नाही.