भारताचे संविधान ( राज्यघटना )
सरकारी कामकाज चालविणे :
अनुच्छदे १६६ :
राज्य शासनाने कामकाज चालवणे :
(१) राज्य शासनाची संपूर्ण शासकीय कारवाई, राज्यपालाच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल.
(२) राज्यपालाच्या नावाने केलेले व निष्पादित केलेले आदेश व इतर संलेख, राज्यपालाने करावयाच्या नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रीतीने अधिप्रमाणित केले जातील, आणि ज्याप्रमाणे अधिप्रमाणित करण्यात आलेला आदेश किंवा संलेख हा, राज्यपालाने केलेला किंवा निष्पादित केलेला नाही, या कारणावरून त्याची विधिग्राह्यता प्रश्नास्पद केली जाणार नाही.
(३) राज्य शासनाचे कामकाज अधिक सोयीस्कररीत्या चालावे यासाठी, आणि उक्त कामकाज हे, ज्याच्याबाबत या संविधानाद्वारे किंवा त्याअन्वये राज्यपालाने स्वविवेकानुसार कृती करणे आवश्यक आहे असे कामकाज नसेल तेथवर, ते मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राज्यपाल नियम करील.
१.(***)
————–
१. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २८ द्वारे खंड (४) समाविष्ट केलेला होता (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून) तो संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम २३ द्वारे गाळला (२० जून, १९७९ रोजी व तेव्हापासून).