भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
दस्तऐवजासंबंधीची गृहीतके :
कलम ७८ :
प्रमाणित प्रतींच्या खरेपणासंबंधीची गृहीतके :
१) जो दस्तऐवज म्हणजे कोणत्याही विशिष्ट तथ्याचा पुरावा म्हणून स्वीकार्य असल्याचे कायद्याद्वारे घोषित केलेले असे प्रमाणपत्र, प्रमाणित प्रत किंवा अन्य दस्तऐवज असल्याचे दिसत असून केंद्र शासनाच्या स्वत:च्या किंवा एखाद्या राज्य शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने जो रीतसर प्रमाणित केला असल्याचे दिसते असा प्रत्येक दस्तऐवज खरा असल्याचे न्यायालय गृहीत धरील :
परंतु, दस्तऐवज त्यासंबंधात कायद्याने निदेशित केल्याप्रमाणे सारत: त्याच नमुन्यात असला पाहिजे व त्याच रीतीने निष्पादित झाला असल्याचे दिसत असेले पाहिजे.
२) ज्या कोणत्याही अधिकाऱ्याने असा कोणताही दस्तऐवज स्वाक्षरित किंवा प्रमाणित केल्याचे दिसत असेल त्याने, जे अधिकारपद आपण धारण केले असल्याचा अशा कागदपत्रात दावा केला असेल ते अधिकारपद त्याने त्या कागदपत्रावर स्वाक्षरी करतेवेळी धारण केले होते असेही न्यायालय गृहीत धरील.