भारतीय पुरावा अधिनियम २०२३
कलम ८ :
कटवाल्याने सामाईक बेताला अनुलक्षून केलेली वक्तव्ये किंवा कृती :
अपराध किंवा कारवाईयोग्य दुष्कृती करण्यासाठी दोन किंवा अधिक व्यक्तींनी मिळून कट केला आहे असे समजण्यास रास्त कारण असेल तेथे, त्यांच्यापैकी कोणाही एकाने पहिल्याप्रथम जेव्हा असा उद्देश मनात धरला त्या वेळेनंतर अशापैकी कोणाही एका व्यक्तीने त्यांच्या सामाईक बेताला अनुलक्षून केलेले कोणतेही वक्तव्य, कृती लिखाण हे, ज्यांनी याप्रमाणे कट केला असा समज असेल त्यांपैकी प्रत्येक व्यक्तीच्या विरूद्ध, कटाचे अस्तित्व शाबीत करण्याचा व तसेच अशी कोणतीही व्यक्ती त्यात सहभागी होती हे दाखवण्याच्या प्रयोजनार्थ संबद्द तथ्य आहे.
उदाहरण :
राज्या विरुद्ध युद्ध करण्याच्या कटात (ऐ) सामील झाला आहे असे समजण्यास रास्त आधारकारण आहे.
कटाच्या प्रयोजनार्थ (बी) ने युरोपमध्ये शस्त्रे पैदा केली, तशाच उद्दिष्टासाठी (सी) ने कलकत्यात पैसे जमवले, (डी) ने मुंबईत कटात सामील होण्यासाठी काही व्यक्तीचे मन वळवले, (ई) ने डोळ्यापुढील उद्दिष्टांचा पुरस्कार करणारे लिखाण आग्रा येथे प्रकाशित केले व (सी) ने कलकत्यात जमवलेले पैसे (एफ) ने दिल्लीहून (जी) कडे सिंगापुरला पाठवले ही तथ्ये व कटाचा तपशील देणारे जे पत्र (एच) ने लिहिले त्याचा मजकूर या सर्व गोष्टी (ऐ) ला ज्ञात नसल्या व ज्यांनी त्या केल्या त्या व्यक्ती त्याला अपरिचित असल्या व त्या गोष्टी तो कटात सामील होण्यापूर्वी किंवा त्याने त्यातून अंग काढून घेतल्यानंतर घडल्या असे जरी असले तरी, त्यांपैकी प्रत्येक गोष्ट ही कटाचे अस्तित्व शाबीत करणे व (ऐ) ची त्यातील सामीलकी शाबीत करणे या दोन्हींसाठी संबद्ध आहे.