भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५६ :
सत्यवादित्वाची परीक्षा करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांना विरोधणाऱ्या पुराव्यास बंदी :
साक्षीदाराच्या चारित्र्याला धक्का पोचवून त्याची विश्वासपात्रता डळमळीत करण्याकडे ज्या प्रश्नाचा रोक असून तेवढ्यापुरताच चोकशीशी संबद्ध असेल असा कोणताही प्रश्न त्याला विचारण्यात येऊन त्याने त्याचे उत्तर दिलेले असेल तेव्हा, त्याच्या कथनातील विरोध दाखवून देण्यासाठी कोणताही पुरावा देता येणार नाही; पण जर त्याने खोटे उत्तर दिले तर, खोटा पुरावा दिल्याबद्दल नंतर त्याच्यावर दोषारोप ठेवता येईल.
अपवाद १ :
जर साक्षीदाराला एखाद्या गुन्ह्याबद्दल त्याला पूर्वी दोषी ठरवण्यात आले होते किंवा काय असा प्रश्न विचारला व त्याने ते नाकबूल केले तर, त्यांच्या पूर्व दोषसिद्धीचा पुरावा देता येईल.
अपवाद २ :
जर साक्षीदाराला त्याच्या नि:पक्षपातीपणाबद्दल शंका व्यक्त करू पाहणारा असा कोणताही प्रश्न विचारला व सूचित केलेली तथ्ये नाकबूल करून त्याने त्याचे उत्तर दिले तर, त्याच्या कथनातील विरोध दाखवून देता येईल.
उदाहरणे :
(a) क) हमीदाराविरुद्ध करण्यात आलेल्या मागणीला तीत कपट आहे या कारणावरुन विरोध करण्यात आला आहे. आधीच्या एका संव्यवहारात कपटपूर्ण मागणी केली नव्हतीस काय ? असा प्रश्न मागणीदाराला विचारण्यात येतो. तो नाही म्हणतो. त्याने अशी मागणी केली होती हे दाखवण्यासाठी पुरावा पुढे करण्यात येतो. पुरावा अस्वीकार्य आहे.
(b) ख) अप्रामाणिकपणाबद्दल तुला एका पदावरुन काढून टाकण्यात आले नव्हते काय? असा प्रश्न साक्षीदाराला विचारला जातो. तो नाही म्हणतो. अप्रामाणिकपणाबद्दल त्याला काढून टाकलेले होते हे दाखवून देण्यासाठी पुरावा पुढे करण्यात येतो. पुरावा स्वीकार्य नाही.
(c) ग) विवक्षित दिवशी आपण गोवा येथे (बी) ला पाहिले होते असे (ऐ) प्रपादन करतो. तू त्या दिवशी वाराणसी नव्हतास काय ? असे (ऐ) ला विचारण्यात येते. तो नाही म्हणतो. (ऐ) त्या दिवशी कलकत्यात होता हे दाखवून देण्यासाठी पुरावा पुढे करण्यात येतो. ज्या तथ्यामुळे (ऐ) च्या विश्वासपात्रतेवर परिणाम होतो त्याबाबत त्याच्या कथनांतील विरोध दाखवणारा म्हणून नव्हे तर, प्रस्तुत दिवशी (बी) गोव्यामध्ये दिसला होता या अभिकथित तथ्याला विरोधणारा पुरावा म्हणून तो स्वीकार्य आहे. यांपैकी प्रत्येक बाबतीत, साक्षीदाराची नाकबुली खोटी असती तर खोटा पुरावा देण्याबद्दल त्याच्यावर दोषारोप ठेवता आला असता.
(d) घ) (ऐ) ज्याच्याविरुद्ध साक्ष देत आहे त्याच्या कुटुंबाचे (बी) च्या कुटुंबाशी कुलवैर नव्हते काय असा त्याला प्रश्न विचारण्यात येतो. तो नाही म्हणतो. त्याच्या नि:पक्षपातीपणाबद्दल संशय व्यक्त करण्याकडे त्या प्रश्नाचा रोख आहे या कारणावरुन (ऐ) ला विरोधता येईल.