Bp act कलम ३३: १.(२.(सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याची शक्ती:))

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रकरण ४ :
पालीस – विनियम :
कलम ३३:
१.(२.(सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या विनियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याची शक्ती:))
१) ३.(या पोट-कलमात विनिर्दिष्ट केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या संबंधात आयुक्तास, उपरोक्त बाबींपैकी कोणत्याही बाबींच्या संबंधात ४.( या कलमाचे खंड (अ),(ब),(ड),(डब), (इ), (ग), (र),(ट), आणि (यू)) याखाली येणाऱ्या बाबी सोडून) जिल्हा दंडाधिकाऱ्यास आणि या कलमाचा खंड (य) धरून उपरोक्त खंडाखाली येणाऱ्या बाबींच्या संबंधात अधीक्षकास त्यांच्या त्यांच्या प्रभाराखालील क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात पुढील गोष्टींची या अधिनियमाशी विसंगत नसतील असे नियम किंवा आदेश करता येतात, त्यातफेरफार करता येतील किंवा ते विखंडित करता येतील:
अ) घाटांवर, धक्क्यांवर व उतरण्याच्या जागांवर व रेल्वे स्टेशनाबाहेर, उतारुंचे सामान वाहून नेण्याकरिता काम करु इच्छित असलेल्या व्यक्तींना लायसन्स देणे व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे व अशा रीतीने कामावर लावलेल्या व्यक्तींच्या मजुरीच्या आकाराचे प्रमाण अमलात आणण्याची तरतूद करणे;
ब) लोकांस धोका, अडथळा किंवा गैरसोय न व्हावी म्हणून व सार्वजनिक जागांवरील सर्व प्रकारच्या रहदारीने विनियमन करणे व घोड्यांवर, गाड्यांवर, सायकलने किंवा पायी जाणाऱ्या व्यक्तींनी किंवा गुरे नेणाऱ्या किंवा त्यांच्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींनी रस्त्यांचा व सार्वजनिक जागांचा जो उपयोग करावयाचा त्यांचे विनियमन करणे;
क) वाहने, रस्त्यावर व सार्वजनिक जागांवर ज्या शर्तीवर उभी करुन ठेवता येतील त्या शर्तीचे विनियमन करणे व वाहने व जनावरे उभी करण्याच्या जागा म्हणून रस्त्यांचा जो उपयोग करावयाचा त्याचे विनियमन करणे;
ड) रस्त्यावर व सार्वजनीक जागांवर वाहनांनी दिवे किती व कोठे आणि कोणत्या वेळेच्या दरम्यान वापरले पाहिजेत ते विहित करणे;
५.(डअ) जलप्रांगण किंवा राष्ट्रीय जलपथाव्यतिरिक्त अंतर्देशीय जलपथ यांतील जलयानांवर किंवा बोटीवर कोणतीही चित्रे, जाहिराती, वृत्तफलक (न्यूज बोर्ड) किंवा जाहीर नोटिसा लावण्याबाबत लायसन्स देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा त्यास मनाई करणे.)
६.(डब) जे कोणतेही चिन्ह, साधन किंवा प्रतिरूपण कोणत्याही रस्त्याच्या एखाद्या ठिकाणाहून दिसण्यायोगे असेल आणि सदरहू नियमांत किंवा आदेशांत विनिर्दिष्ट केलेल्या अशा उंचीवर (जवळची वाहतूक विचारात घेऊन आणि त्या उंचीवरील असे चिन्ह, साधन किंवा प्रतिरुपण लक्ष वेधुन घेण्याचा किंवा अशा वाहतूकीस अडथळा आणण्याचा संभव आहे. हे विचारात घेऊन) कोणत्याही जागेवर, इमारतीवर किंवा संरचनेवर उभारले असेल किंवा उंचावर धरले असेल, असे कोणतेही चिन्ह, साधन किंवा प्रतिरुपण जाहिरातीच्या प्रयोजनाकरिता उभारण्यात, प्रदर्शित करण्यास, बसविण्यास किंवा ते ठेवण्यास लायसन्स देणे, त्यावर नियंत्रण ठेवणे किंवा मनाई करणे;)
ई) याबाबत विहित करण्यात येईल अशा विनिमयानुसार असेल त्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, दिवसाच्या ज्या विवक्षित वेळांत रस्त्यातून किंवा विनिर्दिष्ट केलेल्या विवक्षित रस्त्यांतून गुरे नेता कामा नये त्या वेळा विहित करणे;
फ) कोणताही हत्ती किंवा कोणतेही जंगली किंवा भयंकर जनावर कोणत्याही रस्त्यांतून नेणे, हाकणे, वाटेने नेणे किंवा वाहून नेणे या गोष्टींचे विनियमन करणे;
ग) इमारती लाकडे, परांच्याचे वासे, शिड्या, लोखंडी तुळ्या किंवा कांबी, बाष्पयंत्रे किंवा इतर अवजड वस्तू ज्या रीतीने व पद्धतीने रस्त्यांतून वाहून नेल्या पाहिजेत ती रीत व पद्धत व त्याप्रमाणे त्या वाहून नेण्याचे मार्ग व वेळा यांचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे;
ह) बंदुकीची दारु किंवा इतर कोणताही स्फोटक पदार्थ, रस्त्यामधून व सार्वजनिक जागांतून वाहून नेण्यासाठी लायसन्स देणे, त्यावर निर्बंध घालणे किंवा जवळपास राहणाऱ्या किंवा जवळून जाणाऱ्या लोकांस अडथळा, गैरसोय, उपद्रव, धोका, भय किंवा नुकसान पोहोचू नये म्हणून असे पदार्थ रस्त्यांमधून व सार्वजनिक जागांतून वाहून नेण्यास मनाई करणे;
आय) विनिर्दिष्ट केलेल्या विवक्षित रस्त्यांव्यतिरिक्त इतर रस्त्यांमधून व विनिर्दिष्ट केलेल्या वेळांव्यतिरिक्त इतर वेळात आणि त्याबाबत तो विहित करील अशा विनिमयांस अधीन राहून सांसर्गिक किंवा संक्रामक रोग झालेल्या व्यक्ती अगर जनावरे आणि जनावरांची प्रेते किंवा त्यांचे भाग आणि मनुष्यांची प्रेते उघडी ठेवण्यास फिरविण्यास मनाई करणे;
ज) त्याबाबत त्यास जे नियम करता येतील त्यांस अधीन असेल त्याच्याव्यतिरिक्त इतर बाबतीत, ज्या वेळांत दुर्गंधीयुक्त पदार्थ किंवा वस्तू विवक्षित रस्त्यांवरील घरातून किंवा इमारतीतून बाहेर नेऊ नयेत, किंवा त्या अशा घरात अगर इमारतीत नेऊ नयेत किंवा त्या अशा रस्त्यांतून वाहून नेऊ नयेत त्या वेळा विहित करणे;
के) जनावरांची कत्तल करण्यासाठी, जनावरांची प्रेते किंवा कातडी साफकरण्यासाठी उपद्रवकारक किंवा दुर्गंधीयुक्त पदार्थ टाकण्यासाठी आणि शौचास जाण्यासाठी वेगळ्या जागा राखून ठेवणे;
ल) मनुष्याचा किंवा जनावराचा साथीचा किंवा संक्रामक रोग चालू असेल किंवा होण्याची भीती असेल त्या प्रसंगी, तो रोग होऊ न देण्यासाठी अगर त्याचा प्रसार होऊ न देण्यासाठी राज्य शासनाकडून निदेश देण्यात येईल किंवा मंजूरी देण्यात येईल त्याचप्रमाणे जागेच्या भोगवटादारांनी आणि तीत राहणाऱ्या व्यक्तींनी ती स्वच्छ ठेवणे आणि रोगजंतुरहित करणे, आणि तो रोग झालेल्या किंवा झाला आहे असे वाटत असलेल्या व्यक्तींना किंवा जनावरांना वेगळे ठेवून त्यांची व्यवस्था ठेवणे;
म) पाणीपुरवठ्याचे कोणतेही साधन किंवा पात्र किंवा पाणीपुरवठा पूर्णपणे किंवा विवक्षित प्रयोजनासाठी बंद करण्याविषयी निदेश देणे किंवा असा वापर विवक्षित प्रयोजनासाठीच करण्याविषयी निदेश देणे आणि असे साधन किंवा पात्र किंवा त्यांतील पाणी बिघडू नये याविषयी तजवीज करणे;
न) रस्त्यांमध्ये किंवा सार्वजनिक जागांमध्ये किंवा त्याजवळ गायनवादन करणे, वाद्य, ढोल, ताशे किंवा इतर वाद्ये वाजविणे आणि शिंगे किंवा इतर कर्कश वाद्ये वाजविणे यांबाबत लायसन्स देणे, यावर नियंत्रण ठेवणे किंवा जवळून जाणाऱ्या लोकांस अडथळा, गैरसोय, उपद्रव, धोका, भय किंवा नुकसान पोहचू नये म्हणून त्यास मनाई करणे;
ओ) जमाव व रस्त्यातून किंवा रस्त्यावरुन जाणाऱ्या मिरवणुका यांतील व्यक्तींची वर्तणूक व वागणूक किंवा कृती याचे विनियमन करणे व मिरवणुकांच्या बाबतीत त्यांनी ज्या मार्गाने, ज्या पद्धतीने व ज्या वेळी जावे तो मार्ग, ती पद्धत व त्या वेळा विहित करणे;
प) रहदारीस अडथळा होईल किंवा उजफेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने कोणत्याही रस्त्यात अगर रस्त्याच्या भागात कोणतीही दोरी अगर काठी आडवी टांगण्यास किंवा ठेवण्यास किंवा पुढे आलेला भाग किंवा संरचना उभारण्यास मनाई करणे;
क्यू) तो करील अशा वाजवी नियमानुसार असेल ते खेरीजकरुन, इतर बाबतीत कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी इमारतीचे सामान अगर इतर वस्तू ठेवण्यास किंवा कोणत्याही घोडा किंवा इतर जनावरे बांधून ठेवण्यास अगर अटकावून ठेवण्यास मनाई करणे;
र) पुढील गोष्टी करण्यास लायसन्स देणे, त्यावर नियंत्रण घालणे किंवा जवळपासच्या रहिवाशांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना अडथळा, गैरसोय, उपद्रव, धोका, भय किंवा नुकसान पोहचू नये म्हणून मनाई करणे-
एक) त्याबाबत योग्य रीतीने प्राधिकृत केलेले शासकीय कर्मचारी किंवा नगरपालिका अधिकारी यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागांवर व त्यालगत असलेल्या इमारतीच्या बाहेरच्या बाजूस रोषणाई करणे;
दोन) रस्त्यांमध्ये किंवा सार्वजनिक जागांमध्ये किंवा त्यांच्या जवळपास खडकांना सुरुंग लावणे किंवा खड्डे खणणे.
तीन) कोणत्याही सार्वजनिक जागेत ७.(किंवा सार्वजनिक जागेजवळ किंवा कोणत्याही) सार्वजनिक करमणुकीच्या स्थानात ध्वनिक्षेपकाचा उपयोग करणे;
स) वाजवी वाटतील अशा अपवादात्मक गोष्टी वगळून, मोडकळीस आलेल्या इमारतीमुळे किंवा इतर कारणामुळे धोका उत्पन्न होईल अशा बाबतीत विवक्षित रस्ते किंवा जागा तात्पुरत्या बंद करणे;
ट) ज्यापासून जाणाऱ्या-येणाऱ्यास, जवळपास राहणाऱ्या व्यक्तीस किंवा सर्वसाधारण लोकांस धोका उत्पन्न होण्याचा संभव असेल असे, इमारती व ओटे बांधण्याचे व इतर संरचना करण्याचे, ती दुरुस्त करण्याचे व ती पाडण्याचे काम करताना व्यक्तीस व मालमत्तेस हानी पोहचणार नाही अशी तजवीज करणे;
यू) या बाबतीत तो जे वाजवी नियम करील त्या नियमांस अधीन असेल त्याव्यतिरिक्त इतर रीतीने, कोणत्याही रस्त्यात किंवा इमारतीत किंवा कोणत्याही रस्त्यावर किंवा इमारतीवर किंवा कोणत्याही रस्त्यापासून किंवा इमारतीपासून पन्नास फुटाच्या आत कोणतेही गवत किंवा इतर वस्तू पेटविणे किंवा जाळणे किंवा होळी पेटविणे किंवा कोणतेही अग्निशस्त्र किंवा हवेच्या दाबाने उडणारी बंदूक (एअर-गन) स्वैरपणे उडविणे किंवा दारुकाम सोडणे किंवा ेकणे अगर फायर बलून किंवा अग्निबाण सोडणे, उडविणे किंवा कोणताही खांब किंवा इतर वस्तू, रस्त्यावर दिवे किंवा तशा प्रकारची रोषणाईची इतर साधने लावण्यासाठी कोणत्याही रस्त्याच्या बाजूस ठेवणे किंवा रस्त्यावर आडवी बसविणे या गोष्टीस मनाई करणे;
व्ही) प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही जागा, कोणतीही धर्मशाळा, गावाची वेस किंवा इतर कोणतेही सार्वजनिक स्थळ याचा फायदेशीर व सोईचा उपयोग सर्वांस सारखा व योग्य रीतीने व्हावा म्हणून आणि जेथे येणाऱ्या लोकांनी व्यवस्थीत रीतीने वागावे म्हणून व्यवस्था करण्यासाठी तिचा उपयोग कोणत्या वेली आणि कोणत्या रीतीने करावा याचे विनियमन करणे.
डब्ल्यू) एक) सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान किंवा सार्वजनिक करमणुकीचे स्थान यास लायसन्स देणे त्यावर नियंत्रण ठेवणे,
दोन) जवळपासच्या रहिवाशांना किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींना अडथळा, गैरसोय, त्रास, धोका किंवा नुकसान पोहोचू नये म्हणून सार्वजनिक मनोरंजनाचे स्थान किंवा सार्वजनिक करमणुकीचे स्थान किंवा संमेलनाचे स्थान किंवा संमेलनाचे स्थान चालविण्यास मनाई करणे,
तीन) सार्वजनिक मनोरंजनाच्या स्थानात किंवा सार्वजनिक करमणुकीच्या स्थानात किंवा सार्वजनिक संमेलन स्थानात प्रवेश करण्याच्या किंवा तेथून बाहेर पडण्याच्या साधनाचे विनियमन करणे आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व तेथे अशांतता निर्माण होऊ न देण्यासाठी तरतूद करणे;
८.(डब्ल्यू अ) एक) ९.(सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता यासाठी किंवा सर्वसाधारण लोकांच्या हिताच्या दृष्टीने) विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादात्मक गोष्टी वगळून सार्वजनिक मनोरंजनासाठी मेळे व तमाशे यांसहित केलेल्या गाण्याच्या, नृत्याच्या, नकलांच्या किंवा रंगभूमिविषयक प्रयोगांना किंवा इतर प्रयोगांना लायसन्स देणे किंवा नियंत्रण ठेवणे;
दोन) सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता राखण्याच्या दृष्टीने किंवा सर्वसाधारण लोकांच्या हिताच्या दृष्टीने कलावंताना कामावर लावणे व अशा प्रयोगाच्या वेळी कलावंत व प्रेक्षक यांच्या वर्तणुकीचे विनियमन करणे;
तीन) अशा प्रयोगाचे १०.(आणि त्यासंबंधातील, कोणतीही संहिता असल्यास, लिखितांचे आणि कोणत्याही शर्ती असल्यास, शर्तींना अधीन राहून, त्याबद्दलचे योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता) ११.(राज्य शासनाच्या मते ज्यांना साहीत्य, रंगभूमी आणि अशा परिनिरीक्षणासंबंधीच्या इतर बाबी यांचे ज्ञान किंवा अनुभव असेल अशा व्यक्ती ) ज्याच्या सदस्य असतील अशा १२.(संपूर्ण राज्यासाठी किंवा संबंधित क्षेत्रासाठी त्या प्रयोजनार्थ राज्य शासनाने नेमलेल्या मंडळाकडून) किंवा आयुक्ताने किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याने याबाबत नेमलेल्या सल्लागार समितीकडून पूर्वपरिनिरीक्षण करणे, १३.(मंडळाच्या आदेशाविरुद्ध किंवा निर्णयाविरुद्ध विहित प्राधिकरणाकडे अपील करणे, त्याची (प्राधिकरणाची) नियुक्ती किंवा रचना, त्याची कार्यपद्धती आणि त्यास सहाय्यभूत अशा इतर बाबी आणि अशा प्रयोगांच्या किंवा लिखितांच्या (संहितांच्या) परिनिरीक्षणासाठी, अशी प्रमाणपत्रे मिळण्यासाठी किंवा त्यांच्या दुसऱ्या प्रती देण्यासाठी केलेल्या अर्जांसाठी किंवा अशा अपिलांच्या संबंधात आकरण्यात यावयाची फी (मग ती न्यायालय फी मुद्रांकाच्या स्वरुपात असो किंवा अन्य स्वरुपात असो) या गोेष्टींची तरतूद करणे.))
चार) ज्या वेळेत व ज्या ठिकाणी असे प्रयोग करता येतील त्या वेळेचे व त्या ठिकाणाचे विनियमन करणे.
१४.(डब्ल्यू ब) सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता या दृष्टीने अथवा नृत्यशाळा म्हणून वापर केलेल्या सर्वसाधारण सार्वजनिक स्थानांच्या दृष्टीने (विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अपवादांसह) लायसेन्स देणे किंवा त्याचे नियंत्रण करणे.)
एक्स)सार्वजनिक मनोरंजनाच्या स्थानात प्रवेश मिळविण्याच्या कोणत्याही तिकिटांच्या किंवा पासाच्या– मग तो कोणत्याही नावाने ओळखला जात असो, विक्रिचे विनियमन करणे किंवा तिला मनाई करणे.
१५.(एक्स अ) प्रत्येक बाबतीत नोंदणी प्रमाणपत्र देण्याचा समावेश करुन खाद्यगृहांची जी नोंदणी खाद्यगृह चालविण्यासाठी या अधिनियमान्वये आवश्यक असलेली व मिळविलेली लेखी परवानगी असल्याचे मानले जाईल अशी नोंदणी करणे अणि विहित मुदतीत अशा नोंदणीचे वार्षिक नवीकरण करणे याचा समावेश असेल;)
य) या अधिनियमान्वये जे कोणतेही लायसेन्स किंवा जी कोणतीही परवानगी मिळवायची असेल किंवा मिळविणे आवश्यक असेल त्या लायसन्ससाठी किंवा परवानगीसाठी अर्ज करण्याकरिता अनुसरावयाची कार्यपद्धती विहित करणे व अशा कोणत्याही लायसेन्सबद्दल किंवा परवानगीबद्दल आकारायची फी विहित करणे :
परंतु असे की, या कलमातील कोणत्याही उपबंधावरुन व या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमानुसार दिलेल्या कोणत्याही लायसन्सवरुन १६.(किंवा नोंदणी प्रमाणपत्रावरुन) कोणत्याही व्यक्तीस, ज्या कोणत्याही दारुबद्दल किंवा मादक द्रव्याबद्दल, मुंबई दारुबंदी अधिनियम, १९४९ अन्वये १७.(किंवा १८.(***) (अबकारी अधिनियम) उत्पादन शुल्क अधिनियम, हैद्राबादच्या मादक औषधी द्रव्यांबाबत अधिनियम, मध्यप्रांत व वऱ्हाड उत्पादन शुल्क अधिनियम, १९१५ किंवा मध्यप्रांत व वऱ्हाड दारुबंदी अधिनियम १९३८ अन्वये) किंवा १९.((अबकारी) उत्पादन शुल्क महसुलासंबंधीच्या किंवा दारु तयार करणे, तिची विक्री करणे व ती सेवन करणे यास मनाई करण्यासंबंधीच्या) त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर विधिअन्वये, लायसन्स, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र आवश्यक असते अशी दारु किंवा मादक द्रव्य आयात करण्याचा, निर्यात करण्याचा, त्याचे परिवहन करण्याचा, ते तयार करण्याचा, विकण्याचा किंवा जवळ बाळगण्याचा अधिकार आहे असे समजण्यात येणार नाही किंवा त्यामुळे अशा कोणत्याही विधिअन्वये कोणत्याही व्यक्तीच्या दायित्वास बाध येतो असे समजण्यात येणार नाही, किंवा त्यामुळे शस्त्रास्त्र अधिनियम, *.(१८७८) याच्या किंवा स्फोटक पदार्थ अधिनियम, १८८४ याच्या, किंवा यांपैकी कोणत्याही अधिनियमान्वये केलेल्या कोणत्याही नियमांच्या उपबंधास किंवा त्या अन्वये कोणत्याही व्यक्तीच्या दायित्वास कोणत्याही रीतीने बाध येतो असे समजण्यात येणार नाही.
परंतू आणखी असे की, या पोट-कलमान्वये केलेले कोणतेही नियम किंवा आदेश यांनुसार कोणतीही उपाययोजना करणे किंवा असे नियम किंवा आदेश या अन्वये लायसन्स २०.(किंवा नोंदणी प्रमाणपत्र) देणे या गोष्टी राज्य शासनाचे नियंत्रण व देखरेख यांच्या अधीन राहतील.
२१.(परंतु आणखी असे की, २२.(कोणत्याही सार्वजनिक जागेमध्ये किंवा जागेच्या जवळ किंवा सार्वजनिक करमणुकीच्या कोणत्याही जागेमध्ये ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यासाठी किंवा सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या २३.(किंवा नृत्य शाळा म्हणून वापरण्यात येणाऱ्या) कोणत्याही जागांसाठी) कोणतेही लायसन्स मंजूर करणाऱ्या किंवा ते मंजूर करण्यास किंवा त्याचे नवीकरण करण्यास नकार देणाऱ्या किंवा ते रद्द करणाऱ्या २४.(किंवा कोणत्याही खाद्यगृहास कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र देण्यास किंवा त्याचे नवीकरण करण्यास नकार देणाऱ्या किंवा ते रद्द करण्याऱ्या) कोणत्याही आदेशामुळे व्यथित व्यक्तीस, असा आदेश मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत, राज्य शासनाकडे किंवा राज्य शासन, सामान्य किंवा विशेष आदेशाद्वारे, निर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याकडे अपील सादर करता येईल.)
२५.(१अ) २६.(पोट-कलम (१) च्या) खंड (डब्ल्यू), (डबल्यू-अ) व (एक्स) अन्वये नियम करण्याची किंवा आदेश देण्याची शक्ती प्रथमत: २७.(महाराष्ट्र राज्याच्या केवळ मुंबई क्षेत्राच्या) संबंधात अमलात असेल, परंतु राज्य शासनाला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे उक्त खंडापैकी सर्व किंवा कोणत्याही खंडाखालील अशी शक्ती, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा तारखेपासून राज्याच्या इतर कोणत्याही क्षेत्रात अमलात येईल अशी तरतूद करता येईल.)
२८.(१ब) खंड (डब्ल्यू), (डब्ल्यू-अ), २९.((एक्स) आणि (एक्स-अ)) अन्वये नियम करण्याच्या आदेश देण्याच्या किंवा नेमणुका करण्याच्या शक्तीचा आणि अशा शक्तीचा उक्त खंडांपैकी कोणत्याही खंडाअन्वये लायसन्स किंवा परवानगी देण्याशी जेथवर संबंध असेल तेथवर तिचा पोट-कलम (१) खंड (य) अन्वये, पोट-कलम (१अ) च्या उपबंधास अधीन राहून महसूल आयुक्ताकडून त्याच्या प्रभाराखालील महसूल विभागात वापर करता येईल.)
२) (एक) पोट-कलम (१), ३०.(खंड (अ) व (क)) याअन्वये नियम करण्याची, त्यातफेरफार करण्याची किंवा ते विखंडित करण्याची शक्ती राज्य शासनाच्या नियंत्रणास अधीन राहील.
(दोन) पोट-कलम (१) च्या उरलेल्या खंडाअन्वये नियम करण्याची, त्यातफेरफार करण्याची किंवा ते विखंडित करण्याच शक्ती त्या शासनाच्या पूर्वमंजुरीस अधीन राहील.
३) प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी एखाद्या जागेचा उपयोग करण्यासंबंधाने पोट-कलम (१) खंड (ब) अन्वये केलेला प्रत्येक नियम हा, सामान्य व रुढ वहिवाटीकडे व व्यक्तिगत बाबतीत प्रेताची ताबडतोब विल्हेवाट लावण्याच्या आवश्यकतेकडे योग्य लक्ष देऊन तयार केला पाहिजे.
४) पोट-कलम (१) खंड (ल) च्या प्राधिकारान्वये प्रखापित केलेला प्रत्येक नियम, ३१.(आयुक्ताच्या प्रभाराखाली नसलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधात) केला असेल तर तो ताबडतोब ३२.(महसूल आयुक्ताला आणि राज्य शासनाला कळविणात येइल)
५) जर या कलमान्वये केलेला किंवा प्रख्यापित केलेला नियम किंवा आदेश हा, कोणत्याही नगरपालिकेच्या किंवा स्थानिक प्राधिकाऱ्याच्या कोणत्याही विधीत, नियमात किंवा उप-विधीत स्थानिक विभागातील लोकांचे आरोग्य, सोय किंवा सुरक्षितता यासंबंधीच्या ज्या कोणत्याही बाबीची तरतूद केली असेल अशा बाबीसंबंधाने असेल, तर असा नियम किंवा आदेश हा यथास्थिती, नगरपालिकेच्या किंवा स्थानिक प्राधिकाऱ्याच्या अशा विधीस, नियमास किंवा उप-विधीस अधीन राहील.
६) या कलमान्वये नियम करण्याच्या, त्यातफेरफार करण्याच्या किंवा ते विखंडित करण्याच्या शक्तीचा वापर हा, केलेले,फेरफार केलेले किंवा विखंडित केलेले नियम पूर्वी प्रसिद्ध करण्याच्या शर्तीस अधीन राहून करण्यात येईल आणि या कलमान्वये केलेला,फेरफार केलेला किंवा विखंडित केलेला प्रत्येक नियम शासकीय राजप्रत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच त्याचा परिणाम होणाऱ्या स्थानिक क्षेत्रात यथास्थिती, ज्या इमारतीशी, संरचनेशी, कामाशी किंवा जागेशी त्याचा विशेष संबंध असेल ती इमारत, संरचना, काम किंवा जागा यांच्या जवळील ठळक ठिकाणी त्याच्या प्रती लावून किंवा दवंडी पिटवून प्रसिद्ध करण्यात येईल किंवा तो नियम करण्याच्या, त्यातफेरफार करणाऱ्या किंवा तो विखंडित करणाऱ्या प्राधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इंग्रजी किंवा स्थानिक भाषेतील त्या ठिकाणच्या वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रसिद्ध करण्यात येईल किंवा या साधनांपैकी कोणत्याही दोन किंवा अधिक साधनांनी किंवा त्या प्राधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा इतर साधनांद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.
परंतु असे की, असे कोणतेही नियम करणे किंवा त्यातफेरफार करणे किंवा ते विखंडित करणे ही गोष्ट ताबडतोब अमलात आणणे आवश्यक आहे अशी परिस्थिती असल्याविषयी, ३३.(महसूल आयुक्त, आयुक्त), ३४.(जिल्हा दंडाधिकारी किंवा अधीक्षक) याची खात्री होईल तर आगाऊ प्रसिद्धीशिवाय असे नियम करता येतील किंवा त्यातफेरफार करता येतील किंवा ते विखंडित करता येतील.
७) या कलमात यापूर्वी काहीही अंतर्भूत असले तरी किंवा त्याअन्वये केलेल्या कोणत्याही नियमात काहीही असले तरी, सक्षम प्राधिकाऱ्याने, वाईट चालीची म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस कोणतेही सार्वजनिक मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे स्थान चालविण्याकरिता ३५.(किंवा नृत्यशाळा चालविण्यासाठी वापर केलेल्या कोणत्याही स्थानाकरिता) लायसन्स देण्याचे नाकारणे किंवा ती चालविण्यास मनाई करणे ३६.(किंवा कोणत्याही खाद्यगृहास, यथास्थिति, कोणतेही नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे नाकारणे किंवा ते चालविण्यास मनाई करणे) हे नेहमी विधिसंमत (कायदेशीर) असेल.
८) संबंधित सर्व व्यक्तींनी, वर सांगितल्याप्रमाणे यथायोग्य रीतीने दिलेला आदेश, तो अमलात असेपर्यंत, पाळणे त्यांचे कर्तव्य असेल.
———
१. १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ याचे कलम ४ पुढीलप्रमाणे आहे :-
४. निकट पूर्ववर्ती कलमान्वये मुख्य अधिनियमाच्या कलम ३३ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या असल्या तरीही उक्त कलम ३३, पोट-कलम (१), खंड (ब), (ड), (डब), (इ) व (ण) आणि खंड (य) याअन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हा दंडाधिकाऱ्याने केलेले आणि ह्या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी कोणत्याही क्षेत्रात अंमलात असलेले सर्व नियम व आदेश हे सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्यात फेरफार करण्यात किंवा ते रद्द करण्यात किंवा त्यात दुरुस्ती करण्यात येईपर्यंत, त्या क्षेत्रात अंमलात असण्याचे चालू राहील.
२. १९६७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याचे कलम ४ पुढीलप्रमाणे आहे :-
४. या अधिनियमाच्या कलम २, खंड (अ) अन्वये मुख्य अधिनियमाच्या कलम ३३ मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी उक्त कलम ३३ पोट-कलम (१) खंड (वाय) व खंड (अ), (आर), (टी) व (यू) या अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन जिल्हा दंडाधिकाऱ्याकडून करण्यात व देण्यात आलेले आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वीच्या कोणत्याही क्षेत्रात अंमलात असलेले, सर्व नियम व आदेश, सक्षम प्राधिकरणाकडून त्यामध्ये फेरबदल करण्यात किंवा ते रद्द करण्यात किंवा त्यात सुधारणा करण्यात येईतोपर्यंत, उक्त क्षेत्रात अंमलात असण्याचे चालू राहील.
३. सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ याच्या कलम ३ (अ) अन्वये आयुक्त व जिल्हा दंडाधिकारी यांस या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९६७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम २ (अ) अन्वये खंड (ब), (ड), (अब), (ई) आणि (ग) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ६ (१) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम २ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ७ अन्वये कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
८. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ६ (१) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
९. सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम (२)(१) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१०. सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
११. सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१२. सन १९६७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम (२) अन्वये राज्य सरकारने नेमलेल्या मंडळाकडून या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
१३. सन १९७३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१४. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१५. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१६. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१७. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १७ (१) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
१८. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई राज्याच्या सौराष्ट्र प्रदेशात किंवा कच्छ प्रदेशात अंमलात असलेला तो अधिनियम हा मजकुर वगळण्यात आला.
१९. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १७ अन्वये अबकारी महसुलासंबंधीच्या या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
२०. सन १९६९ चा महाराष्ट्र अ्रधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
२१. सन १९६७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ याच्या कलम २ अन्वये हे परंतुक समाविष्ट करण्यात आले.
२२. सन १९९५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम २ अन्वये सार्वजनिक करमणुकीच्या (किंवा नृत्यशाळा म्हणून वापरण्यात येणाऱ्या) कोणत्याही जागेसाठी याऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२३. सन १९७४ चा महाराष्ट्र ्रअधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
२४. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
*. आता शस्त्र अधिनियम १९५९ (१९५९ चा ५४) पहा.
२५. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १७ अन्वये पोटकलम समाविष्ट करण्यात आले.
२६. सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
२७. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये दुसऱ्या राज्यात घातलेले प्रदेश वगळून पुनर्रचनेपुर्वीच्या मुंबई राज्याच्या प्रदेशाच्या या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२८. सन १९६० चा महाराष्ट अधिनियम क्रमांक २ अन्वये पोटकलम समाविष्ट करण्यात आले.
२९. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये आणि (एक्स) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३०. सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ याच्या कलम ३ अन्वये खंड (अ), (ब) आणि (क) या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबईबाहेरील कोणत्याही क्षेत्रासंबंधाने या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३२. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याचे कलम ३, अनुसूची अन्वये राज्य सरकारास या मजकुराने सुरु होणाऱ्या व कळविला पाहिजे या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३३. सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये आयुक्त या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३४. सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १३ याच्या कलम ३ अन्ववये किंवा जिल्हा दंडाधिकारी या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३५. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
३६. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ३ अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.

Leave a Reply