महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २५:
कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागीय चौकशीद्वारे पोलीस दलातील दुय्यम व्यक्तींना शिक्षा करणे :
१.(१) राज्य शासनास किंवा पोट-कलम (२) अन्वये. त्या बाबतीत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास, निरीक्षक किंवा पोलीस दलातील दुय्यम दर्जाची कोणतीही व्यक्ती, आपले कर्तव्ये बजाविण्यास अयोग्य आहे असे राज्य शासनाचे किंवा पोटकलम (२) अन्वये त्या बाबतीत प्राधिकृत करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्याचे मत झाल्यास. त्यास तिच्यावर खालीलपैकी एक किंवा त्यापेक्षा अधिक शास्ती लादता येईल.
अ) अशा निरीक्षकाच्या किंवा पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या कोणत्याही व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे किंवा आदेश भंगामुळे झालेल्या शासनाच्या कोणत्याही आर्थिक हानीची संपूर्ण किंवा अंशत: वसुली त्याच्या वेतनातून करण्यात येईल:
ब) निलंबन:
क) खालच्या दर्जावर श्रेणीवर किंवा वेतनश्रेणीवर आणण्यात येईल, किंवा कोणत्याही प्रतिष्ठेच्या पदावरुन काढून टाकण्यात येईल किंवा कोणतीही विशेष वित्तलब्धी काढून घेण्यात येईल.
ड) सक्तीची निवृत्ती :
ई) सेवेतून काढून टाकण्यात येईल, मात्र त्यामुळे भविष्यात पोलीस खात्याव्यतिरिक्त कोणत्याही शासकीय खात्यामध्ये नोकरीसाठी अनर्ह ठरवणार नाही:
फ) बडतर्फी, अशी बडतर्फी भविष्यात शासनाच्या सेवेत नोकरीसाठी अनर्ह ठरवील:
परंतु, त्याच्या वर्तणुकीसंबंधीची चौकशी किंवा कोणत्याही फौजदारी गुन्ह्यासंबंधात त्याच्या विरुध्द आलेल्या तक्रारीचे अन्वेषण प्रलंबित असतानाच्या काळात एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करणे ही, खंड (ब) अन्वये शिक्षा आहे. असे मानण्यात येणार नाही.
(१-क) राज्य शासनास किंवा पोट-कलम(२) अन्वये त्याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास शिस्तभंगाबद्दल किंवा गैरवर्तनाबद्दल अगर ज्यामुळे आपले कर्तव्य बजाविण्यास अयोग्य ठरवील अशा कृत्याबद्दल दोषी असलेला निरीक्षक किंवा पोलीस दलातील दुय्यम दर्जाची कोणतीही व्यक्ती यांचा दोष पोट-कलम (१) मध्ये निर्देशलेली कोणतीही शिक्षा देण्यासारख्या स्वरुपाचा नाही असे राज्य शासनाचे किंवा अशा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे मत असेल तर त्यास अशा निरीक्षकावर किंवा पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या कोणत्याही व्यक्तीवर पुढीलपैकी कोणतीही एक किंवा अधिक शिक्षा लादता येईल:
अ) ताकीद देणे.
ब) ताशेरे ओढणे.(ज्याची नोंद त्याच्या सेवा पुस्तकात घेतली जाईल.)
क) कडक समज देणे.
ड) एक महिन्याच्या पगाराहून अधिक होणार नाही इतका द्रव्य दंड करणे.
ई) वेतनवाढ रोखून धरणे.
परंतु-
(एक) खंड (ग) मध्ये विनिर्दिष्ट केलेली शिक्षा, पोलीस शिपायाच्या दर्जापेक्षा वरील दर्जाच्या कर्मचाऱ्याला देता येणार नाही.
(दोन) खंड (घ) मध्ये विनिर्दिष्ट केलेली शिक्षा, निरीक्षकाला देण्यात येणार नाही.)
२.(महासंचालक व महानिरीक्षक) आयुक्त, ३.(संचालक पोलीस बिनतारी संदेश यांसह) ४.(उपमहानिरीक्षक) आणि ५.(अधिक्षक) ६.(व प्रशिक्षण संस्थेचा प्राचार्य) यांचे शिक्षा देण्याचे अधिकार :
२) ७.(अ) अपर महासंचालक, विशेष महानिरीक्षक यांसह महासंचालक व महानिरीक्षक. सह आयुक्त अपर आयुक्त यांसह आयुक्त, १९.(विशेष आयुक्त) आणि उप महानिरीक्षक यांना पोट-कलम (१) किंवा (१-अ) अन्वये निरीक्षकास किंवा दुय्यम दर्जाच्या कोणत्याही व्यक्तीस. शिक्षा करण्याचा प्राधिकार असेल. तसेच अधीक्षकास त्याला दुय्यम असणारा हाताखालचा जो कोणताही पोलीस अधिकारी निरीक्षकाच्या श्रेणीहून खालच्या श्रेणीचा असेल त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत तसाच प्राधिकार असेल आणि त्यास, त्याच्या हाताखालील निरीक्षकास, त्याच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस अपर महासंचालक व अपर महानिरीक्षक आणि संचालक, पोलीस बिनतारी संदेश व पोलीस उप महानिरीक्षक, अपर महानिरीक्षक यांचा आदेश मिळेतोपर्यंत निलंबित करण्याचा अधिकार असेल.)
ब) ८.(पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचा) प्राचार्य यासही निरीक्षकाच्या दर्जाहून कमी दर्जाची पोलीस दलातील दुय्यम दर्जाची जी कोणतीही व्यक्ती ९.(१०.(अशा ११.(महाविद्यालयात) प्रशिक्षण घेत असेल किंवा) त्याच्या हाताखाली काम करीत असेल त्या व्यक्तीच्या संबंधात तसेच १२.(ज्या जिल्हयात ११.(असे महाविद्यालय) असेल त्या जिल्ह्याच्या) पोलीस दलातील किंवा त्याच्या हातखाली काम करण्यासाठी १०.(अशा ११.(महाविद्यालयास) जोडलेल्या) इतर कोणत्याही जिल्हयाच्या पोलीस दलातील हवालदाराच्या व पोलीस शिपायांच्या संबंधात असाच प्राधिकार राहील. १३.(तसेच त्यास १४.(१०.(अशा ११.(महाविद्यालयात) प्रशिक्षण घेत असलेल्या) किंवा) आपल्या हाताखाली काम करीत असलेल्या निरीक्षकास, त्याजविरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी पूर्ण होईतोपर्यंत आणि १५.(महासंचालक व महानिरीक्षक) किंवा १५.(उपमहानिरीक्षक) याचा आदेश मिळेतोपर्यंत निलंबित करता येईल.
१६. (ब-अ) पोलीस प्रशिक्षण शाळेच्या प्राचार्यास जी कोणीही निरीक्षकाच्या श्रेणीपेक्षा खालच्या श्रेणीची पोलीस दलातील दुय्यम दर्जाची जी कोणतीही व्यक्ती, अशा शाळेत प्रशिक्षण घेत असेल किंवा जी त्याच्या अधिपत्याखाली काम करीत असेल किंवा जिला त्याच्या अधिपत्याखाली काम करण्याकरिता अशा शाळेत नेमून देण्यात आले असेल अशा कोणत्याही व्यक्तीच्या संबंधात. तसाच प्राधिकार असेल.)
१७.(***)
क) या पोट कलमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर, त्याबाबत राज्य शासन देईल अशा आदेशांस आणि नियमांस नेहमी, अधीन राहून करण्यात येईल.
(३) १८.(पोट-कलम (१) (१अ)) व (२) यातील कोणत्याही उपबंधामुळे-
अ) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यावर जो कोणताही अपराध केल्याबद्दल आरोप ठेवण्यात आला असेल त्या अपराधाच्या बाबतीत फौजदारी खटला चालविला जाण्याबद्दल त्याची जी कोणतीही जबाबदारी असेल तिला बाध येणार नाही, अथवा
ब) ज्या प्राधिकाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली असेल त्या प्राधिकाऱ्याच्या हाताखालील कोणत्याही प्राधिकाऱ्यास अशा पोलीस अधिकाऱ्यास पदच्युत करण्याचा किंवा कामावरुन दूर करण्याचा हक्क प्राप्त होणार नाही.
———
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ६ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
३. सन १९७१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ५ अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
४. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
५. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ५(ड) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
७. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ६(२) (क) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
८. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम कलम २८ याच्या कलम ५ (अ) अन्वये पोलीस प्रशिक्षण शाळेचे या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
९. सन १९५५ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २ (१) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१०. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १३(१)(ब) अन्वये सदरहू शाळेत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
११. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ५(अ) अन्वये अशी शाळा, शाळेस, शाळेत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
१२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १३(१)(क) अन्वये नाशिक जिल्ह्याच्या या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आला.
१३. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम ४(२) अन्वये हा मजकूर वगळण्यात आला व सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ५(३) अन्वये पुन्हा समाविष्ट करण्यात आला.
१४. सन १९५५ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६ याच्या कलम २ (२) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१५. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेेंबर १९८२ पासून हा मजकुर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
१६. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ६(२)(ख) अ्रन्वये खंड (खक) समाविष्ट करण्यात आला.
१७. सन १९७१ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम ५(२) अन्वये खंड (बब) वगळण्यात आला.
१८. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ६(२)(क) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
१९. सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट केले.