Bp act कलम ११८ : गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११८ :
गुरे वगैरे कोंडून ठेवण्यात कसूर केल्याबद्दल शिक्षा:
१) राज्य शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ज्या स्थानिक क्षेत्रात हे कलम अमलात आणील अशा कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जी कोणतीही व्यक्ती, हयगयीने किंवा अन्य रीतीने जी गुरे तिची मालमत्ता असेल किंवा तिच्या प्रभाराखाली असतील अशा कोणत्याही गुरांस सूर्यास्त व सूर्योदय यानंतर एक तास याच्या दरम्यान कोंडून ठेवण्यात किंवा निर्बंधाखाली ठेवण्यात कसूर करील अशा व्यक्तीस अपराधसिद्धीनंतर खालीलप्रमाणे शिक्षा होईल:
१.(एक) पहिल्या अपराधाबद्दल एक महिना मुदतीपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल किंवा २.(चार हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील,
(दोन) दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाबद्दल सहा महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल किंवा ३.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.)
स्पष्टीकरण :
कुंपण, भिंत किंवा इतर आवार यामध्ये गुरांना चांगल्या रीतीने कोंडून ठेवलेले असल्याखेरीज या पोट-कलमाच्या अर्थानुसार त्यांना कोंडून ठेवलेले आहे असे समजण्यात येणार नाही आणि त्यांना दोरीने किंवा दुसऱ्या कोणत्याही बांधण्याच्या साधनाने चांगल्या रीतीने निर्बंधाखाली ठेवलेले असल्याखेरीज या पोट-कलमाच्य अर्थाप्रमाणे ती निर्बंधाखाली ठेवलेली आहेत असे समजण्यात येणार नाही.
४.(१अ) पोट-कलम (१) अन्वये त्या अपराधाची न्यायचौकशी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यास,-
अ) अपराधी व्यक्तीच्या नियंत्रणाखाली असलेल्या गुरांच्या अतिक्रमणामुळे जिच्या मालमत्तेचे किंवा जमिनीवरील उत्पन्नाचे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले असेल अशा कोणत्याही व्यक्तीस, ती अपराधी व्यक्ती, दंडाधिकाऱ्यास वाजवी वाटेल अशी दोनशे रुपयांहून अधिक होणार नाही. इतकी नुकसानभरपाई देईल आणि तसेच
ब) ज्या गुरांच्या बाबतीत अपराध घडला आहे अशी गुरे राज्य शासनाकडे सरकारजमा केली पाहिजेत, असा आदेश देता येईल.
१ब) पोट-कलम (१-अ) अन्वये दिलेली कोणतीही नुकसानभरपाई ही, जणू ती या कलमान्वये लादण्यात आलेला दंड आहे असे समजून वसूल करता येईल.
१क) या कलमाखालील अपराध दखली असेल.)
२) कोणत्याही व्यक्तीस या कलमान्वये आवश्यक असल्याप्रमाणे जी गुरे कोंडून किंवा निर्बंधाखाली ठेवण्यात आली नसतील अशी कोणतीही गुरे जवळच्या कोंडवाड्यात घेऊन जाता येतील किंवा पाठविता येतील आणि त्यानंतर संबंधित मालक किंवा इतर व्यक्ती पशु अतिचार अधिनियम, १८७१ याच्या ५.(६.(***) किंवा हैद्राबाद पशु अतिचार अधिनियम) याच्या उपबंधास अधीन असतील. सर्व पोलीस अधिकारी व सर्व पोलीस पाटील आणि ग्राम पोलीस दलातील सर्व व्यक्ती आवश्यक असेल तेव्हा, अशा रीतीने धरणाचे काम करणाऱ्या व्यक्तींना असे धरणे किंवा सोडविणे यास होणाऱ्या विरोधास प्रतिबंध करण्याच्या कामी मदत करतील.
३) या कलमान्वये बसविण्यात आलेला कोणताही दंड, विधिअन्वये तरतूद केलेल्या वसुलीच्या इतर कोणत्याही उपायास हानी न पोचवता, ज्या गुरांच्या बाबतीत अपराद घडला आहे, अशा सर्व किंवा कोणत्याही गुरांची विक्री करुन वसूल करण्यात येईल- मग ती अपराधाबद्दल दोषी ठरविण्यात आलेल्या व्यक्तीची मालमत्ता असो किंवा तो अपराध घडला, तेव्हा ती केवळ तिच्या प्रभाराखाली असो.
——–
१. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १४ (१) अन्वये पहिल्या अपराधाबद्दल या मजकुराने सुरु होणारा आणि दोन्ही शिक्षा होतील या मजकुराने संपणाऱ्या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १५ (अ) अन्वये तीनशे रुपयांपर्यत या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
३. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १५ (ब) अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९५३ चा मुंबई अधिनियम क्रमांक २० याच्या कलम १४(२) अन्वये पोटकलमे समाविष्ट करण्यात आली.
५. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३० अन्वये समाविष्ट करण्यात आले.
६. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये किंवा मुंबई राज्याच्या कच्छ व सौराष्ट्र प्रदेशात अंमलात असल्याप्रमाणेच्या अधिनियमाच्या हा मजकुर वगळण्यात आला.

Leave a Reply