भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५३ :
अटक केलेल्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी :
१) जेव्हा एखाद्या व्यक्तीस अटक करण्यात आली असेल तेव्हा अटक केल्यानंतर तात्काळ केंद्र सरकारच्या किंवा राज्यशासनाच्या सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्याकडून आणि जर असा वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाला नाही, तर नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीकडून अशा व्यक्तीची तपासणी करण्यात येईल :
परंतु असे की, जर वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायीची पुन्हा एकदा शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे असे जर तीचे मत असेल तर ती तसेच करेल :
परंतु आणखी असे की जर अटक केलेली व्यक्ती महिला असेल, तर तेथे शारीरिक तपासणी केवळ महिला वैद्यकीय अधिकाऱ्याकडून किंवा तिच्या देखरेखीखाली करण्यात येईल, आणि जर अशी महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसेल, तर नोंदणीकृत महिला वैद्यकीय व्यवसायीकडून किंवा देखरेखीखाली करण्यात येईल.
२) अटक केलेल्या व्यक्तीची अशाप्रकारे तपासणी करणारा वैद्यकीय अधिकारी किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, अटक केलेल्या व्यक्तीच्या शरीरावर झालेल्या जखमा किंवा qहसाचाराचे व्रण आणि ज्यावेळी अशा जखमा किंवा व्रण करण्यात आले असतील ती अंदाजित वेळ नमूद करणारा अशा तपासणीचा अभिलेख तयार करील.
३) जेव्हा पोटकलम (१)अन्वये तपासणी करण्यात आली असेल तेव्हा वैद्यकीय अधिकारी किंवा यथास्थित नोंदणीकृत वैद्यकीय व्ययसायी अशा तपासणीची एक प्रत अटक केलेल्या व्यक्तीस किंवा अशा अटक केलेल्या व्यक्तीने नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस देण्यात येईल.