भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९ :
अटक झालेल्या व्यक्तीची झडती :
१) जेव्हा केव्हा,
एक) ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली नाही त्याखाली पोलीस अधिकाऱ्याने एखाद्या व्यक्तीला अटक केलेली असेल अथवा ज्या वॉरंटात जामीन घेण्याबाबत तरतूद केलेली आहे त्याखाली तिला अटक केली असेल, पण अटक झालेली व्यक्ती जामीन देऊ शकत नसेल तेव्हा, आणि
दोन) एखाद्या व्यक्तीला वॉरंटाशिवाय किंवा खाजगी व्यक्तीने वॉरंटाखाली अटक केलेली असेल व त्या अटक झालेल्या व्यक्तीला जामीनादेश देणे कायद्याने शक्य नसेल किंवा ती जामीन देण्यास असमर्थ असेल तेव्हा,
अटक करणारा अधिकारी, किंवा जेव्हा खाजगी व्यक्तीने अटक केली असेल तेव्हा ती खाजगी व्यक्ती अटक केलेल्या व्यक्तीला ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन करील तो अधिकारी अशा अटक केलेल्या व्यक्तीची झडती घेऊ शकेल व तिच्या अंगावर जरूर त्या पेहेरलेल्या कपडयांहून अन्य अशा ज्या वस्तू सापडतील त्या सर्व वस्तू सुरक्षितपणे ताब्यात ठेवता येतील व अटक केलेल्या व्यक्तीकडून कोणतीही वस्तू अभिग्रहण करण्यात आली असेल तेव्हा, पोलीस अधिकाऱ्याने कोणत्या वस्तू कब्जात घेतल्या ते दर्शवणारी पावती अशा व्यक्तीला देण्यात येईल.
२) जेव्हा केव्हा एखाद्या स्त्रीची झडती घेणे जरूरीचे असेल तेव्हा, सभ्यता काटेकोरपणे सांभाळून झडती घेतली जाईल. दुसरी स्त्री झडती घेईल.