भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४४८ :
खटले व अपिले वर्ग करण्याचा सत्र न्यायालयाचा अधिकार :
१) जेव्हा केव्हा न्यायाची उद्दिष्टे साधण्यासाठी या पोटकलमाखाली आदेश देणे समयोचित आहे असे सत्र न्यायाधीशाला दाखवून देण्यात येईल तेव्हा, तो एखादा विशिष्ट खटला त्याच्या सत्र विभागातील एका फौजदारी न्यायालयातून दुसऱ्या फौजदारी न्यायालयात वर्ग केला जावा असा आदेश देऊ शकेल.
२) सत्र न्यायाधीशाला कनिष्ठ न्यायालयाच्या अहवालावरून किंवा हितसंबंधित पक्षाच्या अर्जावरून किंवा स्वप्रेरणेने कार्यवाही करता येईल.
३) कलम ४४७ च्या (३), (४), (५), (६), (७) व (९) या पोटकलमांचे उपबंध जसे कलम ४४७ च्या पोटकलम (१) खालील आदेशासाठी उच्च न्यायालयाकडे करावयाच्या अर्जासंबंधात लागू होतात तसे ते या कलमाच्या पोटकलम (१) खालील आदेशासाठी सत्र न्यायाधीशांकडे करावयाच्या अर्जास लागू होतील – मात्र या कलमाच्या पोटकलम (७) मधील रक्कम याऐवजी जास्तीत जास्त दहा हजार रुपये हा शब्दोल्लेख घातलेला असावा त्याप्रमाणे ते पोटकलम लागू होईल.