भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७४ :
बिनदखली प्रकरणात वर्दी आणि तपास :
१) जेव्हा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास अशा ठाण्याच्या हद्दींमध्ये बिनदखली अपराध करण्यात आल्याची वर्दी देण्यात आली असेल तेव्हा, असा अधिकारी यासंबंधात राज्य शासन नियमांद्वारे विहित करील अशा नमुन्यानुसार त्याने ठेवावयाच्या पुस्तकात त्या वर्दीच्या गोषवाऱ्याची नोंद करील किंवा करवील, आणि –
एक) वर्दी दाराला दंडाधिकाऱ्यापुढे पाठवील.
दोन) अशा सर्व प्रकरणांचा दैनंदिन डायरी अहवाल पंधरवड्याने दंडाधिकाऱ्यांना पाठविल.
२) बिनदखली प्रकरणाचे अन्वेषण कोणताही पोलीस अधिकारी अशा प्रकरणाची संपरीक्षा करण्याचा किंवा ते प्रकरण संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार असलेल्या दंडाधिकऱ्याच्या आदेशाशिवाय करणार नाही.
३) असा आदेश मिळालेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला अन्वेषणाबाबत, पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी दखलपात्र प्रकरणी जे अधिकार (वॉरंटाशिवाय अटक करण्याचा अधिकार खेरीजकरून) वापरू शकेल तेच अधिकार वापरता येतील.
४) ज्यांपैकी निदान एक अपराध दखलपात्र आहे अशा दोन किंवा अधिक अपराधांशी प्रकरण संबंधित असेल तेव्हा, अन्य अपराध बिनदखाली असले तरीही, ते प्रकरण दखलपात्र प्रकरण असल्याचे मानले जाईल.