भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ११ :
सार्वजनिक (लोक) प्रशांततेच्या विरोधी अपराधांविषयी :
कलम १८९ :
बेकायदेशीर जमाव :
कलम : १८९ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर जमावाचा घटक असणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश झाला असल्याचे माहीत असूनही त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावाला पांगण्याचा आदेश मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर जमावात सहभागी होण्यासाठी भाडोत्री व्यक्ती गोळा करणे, त्यांना बांधून घेणे किंवा नेमणे.
शिक्षा : अशा जमावातील घटक व्यक्तींसाठी असेल तीच व अशा जमावातील घटक व्यक्तीने केलेल्या कोणत्याही अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
कलम : १८९ (७)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर जमावासाठी गोळा केलेल्या भाडोत्री व्यक्तींना आसरा देणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (८)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : बेकायदेशीर जमावात किंवा दंग्यात सहभागी होण्यासाठी भाडोत्री होणे किंवा शस्त्रसज्ज होऊन जाणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १८९ (९)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : शस्त्रसज्ज होऊन जाणे.
शिक्षा : २ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमल्या असून, त्या जमावातील घटकव्यक्तींचे (सभासदांचे) समान उद्दिष्ट पुढीलप्रमाणे असेल, तर त्या जमावास बेकायदेशीर जमाव असे संबोधण्यात येते, ते असे: –
(a) क) (अ) केंद्रीय किंवा कोणतेही राज्य शासन अथवा संसद किंवा कोणत्याही राज्याचे विधिमंडळ यास अथवा कोणताही लोकसेवक असा लोक सेवक म्हणून आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करत असताना त्यास फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारीपात्र बलप्रदर्शनाद्वारे दहशत घालणे; किंवा
(b) ख) (ब) कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही वैध आदेशिकेच्या (कायदेशीर आदेशाच्या) अंमलबजावणीस प्रतिकार करणे; किंवा
(c) ग) (क) कोणतीही आगळीक (अपक्रिया) किंवा फौजदारीपात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करणे; किंवा
(d) घ) (ड) एखाद्या व्यक्तीविरूध्द फौजदारीपात्र बलप्रयोग करून किंवा फौजदारीपात्र बलप्रदर्शन करुन त्याद्वारे, तिच्या कब्जातील मालमत्तेचा कब्जा काढून घेणे किंवा मिळवणे अथवा तिला असलेला किंवा ती उपभोगीत असलेला मार्गाधिकार किंवा पाणी वापराचा हक्क किंवा अन्य अमूर्त हक्क यापासून तिला वंचित करणे अथवा कोणताही हक्क किंवा मानीव हक्क बजावणे; किंवा
(e) ङ) (इ) फौजदारीपात्र बलप्रयोग करून किंवा फौजदारीपात्र बलप्रदर्शन करुन त्याद्वारे, कोणत्याही व्यक्तीला ती जे करण्यास विधित: (कायद्याने) बद्ध (बांधलेली) नाही ते करण्यास अथवा ती जे करण्यास विधित: (कायद्याने) हक्कदार आहे ते टाळण्यास भाग पाडणे.
स्पष्टीकरण:
जो जमाव, तो जमला असता त्या वेळेस बेकायदेशीर नव्हता तो मागाहून बेकायदेशीर जमाव होऊ शकतो.
२) ज्या कारणांमुळे कोणताही जमाव बेकायदेशीर जमाव ठरतो, त्या तथ्यांची (गोष्टींची) जाणीव असताना, जो कोणी उद्देशपूर्वक त्या जमावात सामील होतो किंवा त्यात थांबून राहतो तो बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्याचे म्हटले जाते आणि जो कोणी अशा बेकायदेशीर जमावाचा घटक (सभासद) असेल त्यास सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) एखाद्या बेकायदेशीर जमावास पांगण्याचा आदेश विधित: (कायद्याने) विहित केलेल्या पध्दतीने देण्यात आला आहे हे माहीत असताना जो कोणी त्यात सामील होईल, किंवा त्यात थांबून राहील त्यास, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) कोणतेही प्राणघातक हत्यार किंवा ती वस्तू हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरली असता मृत्यूस कारण होणे संभवनीय आहे, अशा कोणत्याही वस्तूसह सज्ज होऊन जो कोणी बेकायदेशीर जमावाचा घटक (सभासद) होईल त्यास, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
५) ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडणे संभवनीय आहे अशा, पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही जमावाला पांगण्याबाबत विधित: (कायदेशीर) आदेश मिळाल्यानंतर जो कोणी अशा जमावात जाणीवपूर्वक सामील होईल किंवा त्यातच थांबून राहील त्याला, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
स्पष्टीकरण :
जर तो जमाव पोटकलम (१) च्या अर्थानुसार बेकायदेशीर जमाव असेल तर, अपराधी पोटकलम (३) खाली शिक्षापात्र होईल.
६) जो कोणी एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर जमावात सामील होण्यासाठी किंवा त्याचा घटक (सभासद) होण्यासाठी भाड्याने घेईल, त्यासाठी बांधून घेईल किंवा त्या कामी लावील अथवा असे भाड्याने घेणे किंवा बांधून घेणे किंवा कामी लावणे यास प्रोत्साहन (चिथावणी) देईल किंवा त्याकडे काणाडोळा करील तो अशा बेकायदेशीर जमावाचा घटक (सभासद) म्हणून आणि याप्रमाणे भाड्याने घेतल्यामुळे, बांधून घेतल्यामुळे किंवा कामी लावल्यामुळे त्याला अनुसरुन अशी कोणतीही व्यक्ती अशा बेकायदेशीर जमावाचा घटक (सभासद) म्हणून जो कोणताही अपराध करील असा अपराध त्याने स्वत:च केलेला असावा त्याप्रमाणे त्याबद्दल शिक्षापात्र होईल.
७) जो कोणी स्वत:च्या भोगवट्यातील (ताब्यातील) किंवा अभिरक्षेतील (हुकुमतीखालील) किंवा स्वत:च्या नियंत्रणाखाली असलेल्या कोणत्याही घरात किंवा वास्तूत कोणाही व्यक्तींना, अशा व्यक्ती एखाद्या बेकायदेशीर जमावात सामील होण्यासाठी किंवा त्या जमावातील घटक (सभासद) होण्यासाठी भाड्याने घेतलेल्या आहेत, बांधून घेतलेल्या आहेत किंवा त्याकामी लावलेल्या आहेत अथवा भाड्याने अथवा भाड्याने घेतल्या जाण्याच्या, बांधून घेतल्या जाण्याच्या किंवा त्याकामी लावल्या जाण्याच्या बेतात आहेत हे माहीत असताना आश्रय देईल, त्यांचा स्वीकार करील किंवा त्यांना जमवील, त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
८) जो कोणी पोटकलम (१) मधील विनिर्दिष्ट केलेल्यांपैकी कोणतीही कृती करण्यासाठी किंवा कृती करण्याच्या कामी सहाय्य करण्यासाठी स्वत:ला बांधून घेईल, किंवा भाड्याने घेतला जाईल अथवा त्यासाठी भाडोत्री म्हणून जाण्याची किंवा स्वत:ला बांधून घेण्याची तयारी दर्शवील किंवा तसा प्रयत्न करील त्याला, सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील,
९) जो कोणी पोटकलम (८) मध्ये केल्याप्रमाणे बांधला गेला किंवा भाड्याने घेतला गेला असून, कोणत्याही प्राणघातक हत्यारानिशी किंवा हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता मृत्यूस कारण होण्याचा संभव आहे अशा कोणत्याही वस्तूनिशी सज्ज होऊन जाईल अथवा तसे सज्ज होऊन जाण्यास स्वत:ला बांधून घेईल किंवा त्यास तयारी दर्शवील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
Pingback: Ipc कलम १४१ : बेकायदेशीर जमाव :