Bns 2023 कलम १०० : सदोष मनुष्यवध :

भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण ६ :
मानव शरीरास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी :
जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी :
कलम १०० :
सदोष मनुष्यवध :
मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी शारीरिक क्षती (जखम) पोचवण्याच्या उद्देशाने अथवा एखाद्या कृतीमुळे आपण मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव आहे याची जाणीव असताना, जो कोणी अशी कृती करून मृत्यूस कारणीभूत होतो तो सदोष मनुष्यवधाचा अपराध करतो असे म्हणतात.
उदाहरणे :
(a) क) ऐ हा एक खड्ड्यावर काड्या व गवत टाकून ठेवतो. त्यामुळे मृत्यु घडवून आणावा असा त्याचा उद्देश आहे. अगर मृत्यू घडून येणे संभवनीय आहे याची त्याला जाणीव आहे. ती जमीन पक्की आहे असे समजून बी त्यावरुन चालत जातो आणि त्यात पडून मरतो. ऐ याने सदोष मनुष्यवधाचा अपराध केला आहे.
(b) ख) ऐ हा झुडपांच्या मागे आहे हे बी यांस माहीत आहे; परंतु ते सी यास माहीत नाही. ऐ याचा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने किंवा तो घडून येण्याचा संभव आहे याची जाणीव असताना बी हा सी यास झुडपावर गोळी झाडण्यास प्रवृत्त करतो. सी गोळी झाडतो त्यात ऐ हा मरतो, तर येथे सी हा कोणत्याही अपराधाबद्दल दोषी नसेल; पण बी ने मात्र सदोष मनुष्यवधाचा अपराध केला आहे.
(c) ग) ऐ याने एका पक्ष्याला मारण्याच्या वा चोरुन नेण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्यामुळे त्या झुडपाआड असलेला बी मारला जातो. तो तिकडे असल्याचे ऐ या माहीत नव्हते, तर ऐ हा बेकायदेशीर कृत्य करत असला, तरी तो मनुष्यवधाचा अपराध करत नाही. कारण त्याचा बी ला मारण्याचा उद्देश नव्हता, अगर ज्यामुळे मृत्युचा संभव असल्याचे माहीत आहे अशी कृती करण्याचा उद्देश नव्हता.
स्पष्टीकरण १ :
जी व्यक्ति एखादा विकार, रोग अगर शारीरिक दुर्बलता यांनी पछाडलेल्या (त्रस्त) व्यक्तीस जर शारीरिक नुकसान पोचवील आणि त्यामुळे त्या व्यक्तिचा मृत्यु अधिक लवकर घडवून आणील, तर त्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणला असे मानले जाईल.
स्पष्टीकरण २ :
शारीरिक क्षतीमुळे (नुकसानीमुळे) मृत्यू घडून येईल त्या बाबतीत, योग्य इलाज व उपचार, कौशल्य यांचा अवलंब केला असता, तर मृत्यू टळला असता असे जरी असले, तरी अशी क्षती पोचवणाऱ्या व्यक्तीने मृत्यू घडवून आणला असे मानले जाईल.
स्पष्टीकरण ३ :
मातेच्या पोटातील (गर्भातील) जिवाचा मृत्यू घडवून आणणे हा मनुष्यवध नाही; परंतु त्या जिवाचा कोणताही भाग बाहेर काढण्यात आला असेल, तर त्याने श्वासोच्छवास केला नसला तरी किंवा तो पूर्णपणे जन्माला आला नसला, तरी त्या जिवंत बालकाचा मृत्यू घडवून आणणे हे सदाष मनुष्यवध या सदरात मोडू शकेल.

Leave a Reply