महिलांचे संरक्षण अधिनियम २००५
प्रकरण २ :
कौटुंबिक हिंसाचार :
कलम ३ :
कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या :
या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी, उत्तरवादीची कोणतीही कृती, वगळणूक किंवा क्रिया किंवा वर्तणूक जर –
(a)क) (अ) पीडित व्यक्तीला हानी किंवा इजा पोहोचवील किंवा तिच्या मानसिक किंवा शारीरिक आरोग्याला, सुरक्षेला, जीवनाला, अवयवांना किंवा कल्याणाला धोका पोहोचवीत असेल तर, आणि यामध्ये, शारीरिक गैरवर्तणूक, लैंगिक गैरवर्तणूक, शाब्दिक आणि भावनिक गैरवर्तणूक आणि आर्थिक गैरवर्तणूक करण्याचाही समावेश असेल; किंवा
(b)ख) (ब) ती पीडित व्यक्तीला किंवा तिच्याशी नातेसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, कोणताही हुंडा किंवा इतर मालमत्ता किंवा मूल्यवान प्रतिभूती यासाठीची कोणतीही बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्यासाठी जबरदस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून त्या पीडित व्यक्तीला सतावील, हानी किंवा इजा पोहोचवील किंवा तिला धोका पोहोचवील; किंवा
(c)ग) (क) तिला, पीडित व्यक्तीला किंवा तिच्याशी नातेसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, खंड (अ) किंवा खंड (ब) मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वर्तणुकीद्वारे धमकी देण्याचा प्रभाव असेल; किंवा
(d)घ) (ड) ती, पीडित व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक अन्य इजा किंवा हानी पोहोचवीत असेल, तर ती कौटुंबिक हिंसाचार ठरणारी असेल.
स्पष्टीकरण १ : या कलमाच्या प्रयोजनासाठी,
(एक) शारीरिक गैरवर्तणूक म्हणजे पीडित व्यक्तीला शारीरिक वेदना, हानी पोहोचविण्यास किंवा तिच्या जीवनाला, अवयवाला किंवा आरोग्याला हानी पोहोचण्यास किंवा त्या व्यक्तीचे आरोग्य किंवा विकास यांना अपाय पोहोचवण्यास कारण होईल अशी कोणतीही कृती किंवा वर्तणूक होय आणि त्यात हमला, दंडनीय दहशत आणि दंडनीय बलप्रयोग यांचा समावेश होतो;
(दोन) लैंगिक गैरवर्तणूक यामध्ये महिलेच्या प्रतिष्ठेशी गैरवर्तन करणे, तिची हानी करणे, ती कमी करील किंवा अन्य प्रकारे तिचा भंग करील अशा लैंगिक स्वरूपाच्या कोणत्याही वर्तणुकीचा समावेश होतो;
(तीन) शाब्दिक आणि भावनिक गैरवर्तणूक यामध्ये –
(a)क)(अ) अपमान करणे, कुचेष्टा करणे, पाणउतारा करणे, शिव्या देणे आणि विशेषत: मूल नसल्याच्या किंवा मुलगा नसल्याच्या संबंधात अपमान करणे किंवा कुचेष्टा करणे; आणि
(b)ख)(ब) पीडित व्यक्तीला जिच्याविषयी आपुलकी आहे अशा कोणत्याही व्यक्तीला शारीरिक वेदना देण्याची वारंवार धकमी देणे, यांचा समावेश होतो.
(चार) आर्थिक गैरवर्तणूक यामध्ये, –
(a)क)(अ) पीडित व्यक्तीला कोणत्याही कायद्याने किंवा रूढीनुसार एखाद्या न्यायालयाच्या आदेशान्वये किंवा अन्य प्रकारे प्रदान करण्यायोग्य आहेत व पीडित व्यक्ती ज्याला हक्कदार आहे असे किंवा जे पीडित व्यक्तीला आणि तिला मुले असल्यास, त्यांना घरासंबंधीच्या गरजेसाठी आवश्यक आहे म्हणून मात्र केवळ त्यासाठीच आवश्यक नाहीत, तर इतर कारणासाठीही आवश्यक आहेत असे सर्व किंवा कोणतेही आर्थिक किंवा वित्तीय साधन मार्ग, स्त्रीधन, पीडित व्यक्तीच्या संयुक्तपणे किंवा पृथकपणे मालकीची असलेली मालमत्ता, हिस्सेदारी असलेल्या घराशी संबंधित भाड्याचे प्रदान आणि निर्वाहखर्च;
(b)ख)(ब) घरगुती चीजवस्तूंची विल्हेवाट करणे, पीडित व्यक्तीच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेचे, किमती वस्तूंचे, भागांचे (शेअर्स), प्रतिभूतीचे, बंधपत्रांचे आणि तत्सम गोष्टींचे किंवा पीडित व्यक्तीचा ज्यामध्ये हितसंबंध आहे किंवा कौटुंबिक नात्याच्या दृष्टिकोनातून ती जिला हक्कदार आहे, किंवा पीडित व्यक्तीला किंवा तिच्या मुलांना जी आवश्यक आहे अशी इतर मालमत्ता किंवा तिचे स्त्रीधन किंवा पीडित व्यक्तीने संयुक्तपणे किंवा पृथकपणे धारण केलेली इतर कोणतीही मालमत्ता दुसऱ्याच्या स्वाधीन करणे; आणि
(c)ग) (क) पीडित व्यक्ती कौटुंबिक नातेसंबंधामुळे ज्या साधनमार्गात किंवा सुविधांमध्ये प्रवेश करण्यास हक्कदार आहे अशा प्रवेशावर तसेच, सामायिक वापरातल्या घरामध्ये प्रवेश करण्यावर प्रतिबंध घालणे किंवा तो चालू ठेवण्यावर निर्बंध आणणे,
यांचा समावेश होतो.
स्पष्टीकरण २ :
उत्तरवादीची कोणतीही कृती, अकृती, कृत्य किंवा वर्तणूक ही या कलमानुसार कौटुंबिक अत्याचार ठरते काय हे निर्धारित करण्याच्या प्रयोजनासाठी त्या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती आणि परिस्थिती विचारात घेण्यात येईल.
