Posh act 2013
प्रकरण ४ :
तक्रार :
कलम ९ :
लैंगिक छळवणुकीची तक्रार :
(१) कोणतीही पीडित महिला, कामाच्या ठिकाणच्या लैंगिक छळाची लेखी तक्रार, घटनेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत आणि घटनांच्या मालिकेच्या बाबतीत, शेवटची घटना घडल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत,जर अंतर्गत समिती स्थापन केली असेल तर, अंतर्गत समितीकडे किंवा जर अंतर्गत समिती स्थापन केलेली नसेल तर स्थानिक समितीकडे करील :
परंतु, जेव्हा तिला अशी तक्रार लेखी स्वरूपात करता येऊ शकत नसेल तेव्हा अंतर्गत समितीचा पीठासीन अधिकारी किंवा कोणताही सदस्य किंवा यथास्थिती, स्थानिक समितीचा अध्यक्ष किंवा कोणताही सदस्य, लेखी स्वरूपात तक्रार करण्याकरिता अशा महिलेस सर्व प्रकारचे वाजवी सहाय्य करील :
परंतु, आणखी असे की, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती, परिस्थिती अशी होती की ज्यामुळे उक्त मुदतीत तक्रार दाखल करण्यास महिलेस प्रतिबंध झाला होता, याबद्दल तिची खात्री पटली असेल तर, लेखी कारणे नोंदवून तीन महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या मुदतीसाठी मुदत वाढवू शकेल.
(२) जेव्हा पीडित महिला, तिच्या शारीरिक किंवा मानसिक अक्षमतेमुळे किंवा तिचा मृत्यू झाल्यामुळे किंवा अन्यथा तक्रार करण्यास अक्षम ठरली असेल तेव्हा, तिचा कायदेशीर वारस किंवा विहित करण्यात येईल अशा अन्य व्यक्ती, या कलमान्वये तक्रार करू शकते.