Posh act 2013 कलम २ : व्याख्या :

Posh act 2013
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, –
(a)क)(अ) पीडित महिला याचा अर्थ –
(एक) कामाच्या ठिकाणच्या संबंधात, उत्तरवादीने केलेल्या लैंगिक छळवणूकीच्या कोणत्याही कृत्यास बळी पडली असल्याचे आरोप जिने केले असेल अशी कोणत्याही वयाची महिला – मग ती नोकरीला असो किंवा नसो, असा आहे;
(दोन) राहण्याचे ठिकाण किंवा घर यासंबंधात जी अशा राहण्याच्या ठिकाणी किंवा घरात नोकरी करीत आहे, अशी कोणत्याही वयाची महिला असा आहे.
(b)ख)(ब) समुचित शासन याचा अर्थ –
(एक) जे ठिकाण –
(A)क)(अ) केंद्र सरकारने किंवा संघराज्य क्षेत्राच्या प्रशासनाने स्थापन केलेल्या, त्याच्या मालकीच्या त्याच्या नियंत्रणात असलेल्या किंवा त्याने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पुरविलेल्या निधीतून संपूर्ण किंवा मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होत असलेल्या, अशा कामाच्या ठिकाणाच्या संबंधात, केंद्र सरकार, असा आहे;
(B)ख)(ब) राज्य शासनाने स्थापन केलेल्या त्याच्या मालकीच्या, त्याच्या नियंत्रणात असलेल्या किंवा त्याने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पुरविलेल्या निधीतून संपूर्णत: किंवा मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा होत असलेल्या कामाच्या ठिकाणच्या संबंधात, राज्य शासन, असा आहे;
(दोन) उपखंड (एक) खाली समाविष्ट नसणाऱ्या आणि त्याच्या राज्यक्षेत्रात न मोडणाऱ्या कोणत्याही कामाच्या ठिकाणाच्या संबंधात राज्य शासन, असा आहे.
(c)ग) (क) अध्यक्ष याचा अर्थ, कलम ७ च्या पोटकलम (१) अन्वये नामनिर्देशित केलेल्या स्थानिक तक्रार समितीचा अध्यक्ष, असा आहे;
(d)घ) (ड) जिल्हा अधिकारी याचा अर्थ, कलम ५ अन्वये अधिसूचित केलेला अधिकारी, असा आहे;
(e)ङ)(इ) घरेलू कामगार याचा अर्थ, जी महिला एकतर तात्पुरत्या, कायमस्वरूपी, अंशकालिक किंवा पूर्णकालिक तत्त्वावर प्रत्यक्षपणे किंवा कोणत्याही एजन्सीमार्फत पारिश्रमिकासाठी – मग ते रोख स्वरूपात असो किंवा वस्तूच्या स्वरूपात असो – कोणत्याही कुटुंबात घरगुती काम करण्यासाठी नोकरी करीत असेल, ती महिला, असा आहे; परंतु यामध्ये मालकाच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याचा समावेश होणार नाही.
(f)च) (फ) कर्मचारी याचा अर्थ, नियमित, तात्पुरत्या, तदर्थ किंवा दैनिक रोजंदारीच्या तत्त्वावर, मूळ मालकास माहीत असताना किंवा नसताना, एकतर प्रत्यक्षपणे किंवा कंत्राटदारासह एजंटामार्फत – मग ते पारिश्रमिकासाठी असो किंवा नसो, कोणत्याही कामासाठी कामाच्या ठिकाणी नोकरी करील असलेली किंवा स्वेच्छा तत्त्वावर किंवा अन्य प्रकारे काम करीत असलेली – मग तिच्या नोकरीच्या अटी व्यक्त असो किंवा अव्यक्त असो – व्यक्ती असा आहे आणि यामध्ये सहकामगाराचा, कंत्राटी कामगाराचा, परिवीक्षाधीन कर्मचाऱ्याचा, प्रशिक्षणार्थीचा, अ‍ॅप्रेंटिसचा (शिकाऊ उमेदवाराचा) किंवा अशा अन्य कोणत्याही नावाने ओळखण्यात येणाऱ्या कामगाराचा समावेश होतो.
(g)छ)(ग) मालक याचा अर्थ –
(एक) समुचित शासनाच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही विभागाच्या, संघटनेच्या, उपक्रमाच्या, आस्थापनेच्या, एंटरप्राइजच्या, संस्थेच्या, कार्यालयाच्या, शाखेच्या किंवा युनिटाच्या संबंधात, ह्या विभागाचा, संघटनेचा, उपक्रमाचा, आस्थापनेचा, एंटरप्राइजेसचा, संस्थेचा, कार्यालयाचा, शाखेचा किंवा युनिटाचा प्रमुख अथवा, यथास्थिती समुचित शासन किंवा स्थानिक प्राधिकरण याबाबतीत आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील असा इतर कोणताही अधिकारी असा आहे;
(दोन) उपखंड (एक) मध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणामधील, त्या कामाच्या ठिकाणाचे व्यवस्थापन, पर्यवेक्षण व नियंत्रण करण्याकरिता जबाबदार असलेली कोणतीही व्यक्ती असा आहे;
स्पष्टीकरण :
या उपखंडाच्या प्रयोजनार्थ, व्यवस्थापन यामध्ये, अशा संघटनेची धोरणे तयार करण्याकरिता व प्रशासन चालविण्याकरिता जबाबदार असलेल्या व्यक्तीचा किंवा मंडळाचा किंवा समितीचा समावेश होतो.
(तीन) उपखंड (एक) व (दोन) मध्ये समावेश नसलेल्या कामाच्या ठिकाणच्या संबंधात, त्याच्या किंवा तिच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संविदाविषयक दायित्वे पार पाडणारी व्यक्ती, असा आहे;
(चार) निवासी ठिकाणाच्या किंवा घराच्या संबंधात, ज्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने, कामावर ठेवलेल्या कामगाराची संख्या, मुदत, मर्यादा किंवा अशा कामगाराची संख्या किंवा घरेलू कामगाराच्या नोकरीचे किंवा त्याने पार पाडलेल्या कामांचे स्वरूप विचारात न घेता, घरेलू कामगाराला नोकरीवर ठेवलेले आहे किंवा त्याच्या नोकरीपासून जी व्यक्ती किंवा कुटुंब लाभ घेत आहे, अशी व्यक्ती किंवा कुटुंब, असा आहे.
(h)ज)(ह) अंतर्गत समिती याचा अर्थ, कलम ४ अन्वये घटित केलेली अंतर्गत तक्रार समिती, असा आहे.
(i)झ)(आय) स्थीनिक समिती याचा अर्थ, कलम ६ अन्वये घटित केलेली स्थानिक तक्रार समिती, असा आहे.
(j)ञ)(ज) सदस्य याचा अर्थ, अंतर्गत समितीचा, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीचा सदस्य असा आहे.
(k)ट)(के) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे.
(l)ठ)(ल) पीठासीन अधिकारी याचा अर्थ, कलम ४ च्या पोटकलम (२) अन्वये नामनिर्देशित केलेल्या अंतर्गत तक्रार समितीचा पीठासीन अधिकारी असो आहे.
(m)ड)(म) उत्तरवादी याचा अर्थ, जिच्याविरूद्ध पीडित महिलेने कलम ९ अन्वये तक्रार केलेली आहे, अशी व्यक्ती असा आहे.
(n)ढ)(न) लैंगिक छळवणूक यामध्ये पुढीलपैकी कोणत्याही एका किंवा अधिक अवांछनीय कृत्याचा किंवा वर्तणुकीचा (मग ते प्रत्यक्षपणे केलेले असो किंवा गर्भितपणे असो) समावेश होतो.
(एक) अंगाला स्पर्श करणे किंवा अंगाशी लगट करणे; किंवा
(दोन) लैंगिक पूर्ती करण्याची मागणी करणे किंवा विनंती करणे; किंवा
(तीन) लैंगिकतायुक्त शेरेबाजी करणे; किंवा
(चार) संभोगचित्रण दाखविणे; किंवा
(पाच) लैंगिक स्वरूपाची अन्य कोणतीही अवांछनीय शारीरिक, शाब्दिक किंवा बिगरशाब्दिक वर्तणूक करणे.
(o)ण)(ओ) कामाचे ठिकाण यामध्ये, –
(एक) समुचित शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने किंवा सरकारी कंपनीने किंवा महामंडळाने किंवा सहकारी संस्थेने स्थापन केलेला त्याची मालकी असलेला, त्याच्या नियंत्रणात असलेला, किंवा त्याने प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पुरविलेल्या निधीतून ज्याला संपूर्णत: किंवा अंशत: वित्तपुरवठा होत असलेला कोणताही विभाग, संघटना, उपक्रम, आस्थापना, एंटरप्राइज, संस्था, शाखा किंवा युनिट यांचा;
(दोन) उत्पादन, पुरवठा, विक्री, वितरण किंवा सेवा यांसह वाणिज्यिक, व्यावसायिक, शैक्षणिक, मनोरंजनविषयक, औद्यागिक आरोग्य सेवा किंवा वित्तीय कार्य करणारी खाजगी क्षेत्रातील कोणतीही संघटना किंवा प्रायव्हेट व्हेंचर, उपक्रम, एंटरप्राइज, संस्था, आस्थापना, सोसायटी, ट्रस्ट, अशासकीय संघटना, युनिट किंवा सेवा पुरवठाकार यांचा;
(तीन) रूग्णालये किंवा शुश्रुषागृहे यांचा;
(चार) कोणतीही क्रीडासंस्था, प्रेक्षागार (स्टेडियम), क्रीडासंकुल किंवा स्पर्धेचे किंवा खेळाचे ठिकाण – मग ते प्रशिक्षणासाठी, खेळांसाठी किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या इतर कामासाठी वापरलेले निवासस्थान असो किंवा नसो यांचा;
(पाच) नोकरीच्या निमित्ताने किंवा नोकरीच्या दरम्यान कर्मचाऱ्याने भेट दिलेले कोणतेही ठिकाण, ज्यामध्ये अशा प्रवासासाठी नियोक्त्याने पुरवलेली वाहतूक व्यवस्था समाविष्ट आहे;
(सहा) राहण्याचे ठिकाण किंवा घर
यांचा समावेश होतो;
(p)त)(प) कामाच्या ठिकाणच्या संबंधात असंघटित क्षेत्र याचा अर्थ व्यक्तीची किंवा स्वयंरोजगार कामगाराची मालकी असलेला आणि उत्पादन किंवा मालाची विक्री करीत असलेला किंवा कोणत्याही प्रकारची सेवा पुरविणारा उपक्रम, असा आहे आणि जेव्हा अशा उपक्रमात कामगार नोकरीला असतील तेव्हा अशा कामगारांची संख्या, दहापेक्षा कमी असेल.

Leave a Reply