Posh act 2013
कलम १४ :
खोट्या किंवा द्वेषपूर्ण तक्रारीबद्दल आणि खोट्या पुराव्याबद्दल शिक्षा :
(१) जेव्हा उत्तरवादीविरूद्ध केलेला आरोप द्वेषपूर्ण आहे किंवा पीडित महिलेने किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने, तक्रार खोटी असल्याचे माहिती असताना तक्रार केलेली आहे किंवा पीडित महिलेने किंवा तक्रार करणाऱ्या व्यक्तीने कोणताही बनावट किंवा दिशाभूल करणारा दस्तावेज सादर केला आहे अशा निष्कर्षाप्रत अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती येईल तेव्हा, ती कलम ९ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) अन्वये जिने तक्रार केलेली आहे, अशा महिलेविरूद्ध किंवा व्यक्तीविरूद्ध, तिला किंवा त्याला लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार किंवा जेव्हा असे सेवानियम अस्तित्वात नसतील तेव्हा विहित करण्यात येईल, अशा रीतीने कारवाई करण्याकरिता मालकास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास शिफारस करील :
परंतु, केवळ साधार असल्याचे दाखविण्याच्या असमर्थतेमुळे किंवा अपूर्ण पुरावा दिल्यामुळे या कलमान्वये तक्रारदाराविरूद्ध कारवाई करण्याची आवश्यकता नाही :
परंतु आणखी असे की, कोणत्याही कारवाईची शिफारस करण्यापूर्वी विहित कार्यपद्धतीनुसार चौकशी केल्यानंतर, तक्रारदाराच्या बाजूने द्वेषपूर्ण उद्देशाने तक्रार केली होती हे सिद्ध करण्यात येईल.
(२) जेव्हा कोणत्याही साक्षीदाराने खोटी साक्ष दिलेली आहे किंवा कोणताही बनावट किंवा दिशाभूल करणारा दस्तावेज सादर केला आहे, अशा निष्कर्षाप्रत अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती येईल तेव्हा ती उक्त साक्षीदाराला लागू असणाऱ्या सेवानियमांच्या तरतुदींनुसार किंवा जेव्हा असे सेवा नियम अस्तित्वात नसतील तेव्हा विहित करण्यात येईल, अशा रीतीने कारवाई करण्याकरिता साक्षीदाराच्या मालकास, किंवा यथास्थिती, जिल्हा अधिकाऱ्यास शिफारस करील.