Posh act 2013
कलम ११ :
तक्रारीची चौकशी :
(१) कलम १० च्या तरतुदीस अधीन राहून, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती जेव्हा उत्तरवादी कर्मचारी असेल तेव्हा उत्तरवादीस लागू असलेल्या सेवा नियमांच्या तरतुदींनुसार तक्रारींची चौकशी करण्याची कार्यवाही करील आणि जेव्हा असे कोणतेही नियम अस्तित्वात नसतील तेव्हा, विहित करण्यात येईल अशा रीतीने चौकशी करील किंवा घरेलू कामगाराच्या बाबतीत, स्थानिक समिती जर सकृतदर्शनी प्रकरण अस्तित्वात असेल तर, भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम ५०९ अन्वये किंवा जेव्हा लागू असेल तेव्हा, उक्त संहितेच्या अन्य कोणत्याही संबंधित तरतुदीन्वये, प्रकरण नोंदविण्यासाठी सात दिवसांच्या कालावधीत पोलिसांकडे तक्रार दाखल करील :
परंतु, जेव्हा पीडित महिला, अंतर्गत समितीस, किंवा यथास्थिती, स्थानिक समितीस, कलम १० च्या पोटकलम (२) अन्वये केलेल्या समझोत्याच्या कोणत्याही अटींचे किंवा शर्तीचे उत्तरवादीने पालन केलेले नाही अशी माहिती देईल तेव्हा, अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती तक्रारीची चौकशी करील किंवा यथास्थिती तक्रार पोलिसांकडे पाठवील :
परंतु आणखी असे की, जेव्हा दोन्हीही पक्षकार कर्मचारी असतील तेव्हा, पक्षकारांना चौकशीच्या कालावधीमध्ये बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल आणि समितीसमोरील निष्कर्षांविरूद्ध अभिवेदन करणे त्यांना शक्य व्हावे म्हणून निष्कर्षाची प्रत दोन्ही पक्षकारांना उपलब्ध करून देण्यात येईल.
(२) भारतीय दंड संहितेच्या (१८६० चा ४५) कलम ५०९ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेव्हा उत्तरवादीस अपराधाबद्दल सिद्धदोषी ठरविण्यात येईल तेव्हा न्यायालय कलम १५ च्या तरतुदी विचारात घेऊन, त्यास योग्य वाटेल अशी रक्कम उत्तरवादीने पीडित महिलेस प्रदान करण्याचा आदेश देऊ शकेल.
(३) अंतर्गत समिती, किंवा यथास्थिती, स्थानिक समिती पोटकलम (१) अन्वये चौकशी करण्याच्या प्रयोजनार्थ, जेव्हा पुढील प्रकरणाच्या बाबतीत दाव्यांची न्यायचौकशी करीत असेल तेव्हा, तिला दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) याअन्वये दिवाणी न्यायालयामध्ये निहित असलेले अधिकार असतील;
(a)क)(अ) कोणत्याही व्यक्तीस समन्स काढणे व उपस्थित राहण्यास फर्मावणे आणि त्याची शपथेवर तपासणी करणे;
(b)ख)(ब) दस्तावेजांचा शोध घेण्यास व ते सादर करण्यास फर्मावणे;
(c)ग) (क) विहित करण्यात येईल अशी इतर कोणतीही बाब;
(४) पोटकलम (१) खालील चौकशी नव्वद दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल.