लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
प्रकरण ५ :
प्रकरणासंबंधात माहिती कळविण्याची कार्यपद्धती :
कलम १९ :
अपराधांची माहिती कळविणे :
१) फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जिला, या अधिनियमाखालील अपराध घडण्याची शक्यता आहे याबद्दल धास्ती वाटत असेल किंवा असा अपराध घडलेला आहे याबाबत जिला माहिती असेल अशी कोणतीही व्यक्ती (बालकसुद्धा)
अ) बालकांसंबंधातील विशेष पोलीस पथकाला किंवा
ब) स्थानिक पोलीसांना
अशी माहिती कळवील.
२) पोट-कलम १) अन्वये दिलेल्या प्रत्येक माहितीच्याबाबतीत
अ) नोंद क्रमांकाचा निर्देश केलेला असेल व तो लेखी नमूद केलेला असेल
ब) माहिती कळविणाऱ्याला ती वाचून दाखविण्यात येईल.
क) पोलीस पथकाकडून ठेवल्या जाणाऱ्या पुस्तकात त्या माहितीची नोंद करण्यात येईल.
३) पोटकलम १) खालील माहिती एखाद्या बालकाने दिली असेल तर, त्या माहितीची पोटकलम २) अन्वये, सोप्या भाषेत नोंद करण्यात येईल जेणेकरून नोंद करण्यात येणारा आशय त्या बालकाला समजेल.
४) बालकाला समजत नसलेल्या भाषेत आशयाची नोंद करण्यात येत असल्यास किंवा जर बालकाला ती भाषा समजत नसेल तर, जेथे आवश्यकता वाटत असेल तेथे विहित करण्यात येईल अशी अर्हता व अनुभव असलेला अनुवादक किंवा दुभाषी विहित फी प्रदान करून अशा बालकासाठी पुरविण्यात येईल.
५) ज्याच्याविरूद्ध अपराध करण्यात आलेला असेल अशा बालकाची देखभाल करण्याची व त्याला संरक्षण देण्याची गरज आहे याबाबत बालकासंबंधातील विशेष पोलीस पथकाची किंवा स्थानिक पोलिसांची खात्री पटली असेल तर, ते याबाबतची कारणे लेखी नमूद करून माहिती मिळाल्यानंतर चोवीस तासांच्या आत, विहित करण्यात येईल त्याप्रमाणे त्याची अशी देखभाल करण्याची व त्याला संरक्षण देण्याची (बालकाला आधारगृहात किंवा जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यासह व्यवस्था तात्काळ करतील.
६) बालकासंबंधातील विशेष पोलीस पथक किंवा स्थानिक पोलीस हे अनावश्यक विलंब न लावता; परंतु चोवीस तासांच्या कालावधीच्या आत, बालकाची देखभाल करण्याची व त्याला संरक्षण देण्याची गरज आणि याबाबतीत केलेल्या उपाययोजना यांसह ही बाब बालकल्याण समिती व विशेष न्यायालय किंवा जेथे विशेष न्यायालय नेमून देण्यात आले असेल तेथे सत्र न्यायालयाला कळवतील.
७) पोट-कलम (१) च्या प्रयोजनार्थ, सद्भावनेने माहिती दिल्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर दिवाणी असो किंवा फौजदारी असो असे कोणतेही दायित्त्व असणार नाही.